Sanjay Raut
Sanjay Raut 
मुख्य बातम्या मोबाईल

नाशिकला देखील शिवसेनेला जळगाव पॅटर्न करायचा होता!

सरकारनामा ब्युरो

नाशिक :  जळगावला महापालिकेत सत्तांतर करुन दाखविले. ते देखील माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या घरात. असाच जळगाव पॅटर्न शिवसेनेला नाशिकलाही करायचा होता. मात्र तो थोडक्यात हुकला. आता वाजतगाजत शिवसेनेचा महापौर होईल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.  

खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत केवळ र्जनाच करतात, अशी टीका केली होती. त्याविषयी विचारले असता, त्यांनी गर्जना कृतीतही आणतो म्हणून त्यांची जळगावची सत्ता घालविली व त्यांना घरी बसविले, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. गर्जना करीतच नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवितो. गर्जना कृतीत उतरविली म्हणूनच गिरीश महाजन यांची जळगाव महापालिकेतील सत्ता घालविली, असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, की नाशिकलाही जळगाव पॅटर्न करायचा होता; पण आता वाजतगाजत आणि लोकशाही पद्धतीनेच नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा महापौर करून भगवा फडकवू. त्यासाठी नाशिकला सहा स्थानिक नेत्यांची कोअर टीम केली जाणार आहे. लवकरच त्यांची नाव जाहीर केली जातील. जळगावला भाजपची लोकशाही होती. त्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीने परतफेड केली आहे. जळगाव महापालिकेत घोडेबाजर झाल्याच्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले. जळगावला घोडेबाजार झाला होता, तर पहाटेच्या वेळी शपथ विधी वेळी काय झाला होता, तोही घोडेबाजारच होता, असा आरोपही त्यांनी केला. 

सचिन वाझे चौकशी आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीने पोलिस दलात नाराजी असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. ते म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. एखाद दुसऱ्या घटनेने पोलिस दलावर किंवा राज्य सरकारवर काहीही परिणाम होत नसतो. त्यासाठी केंद्राने ‘एनआयए’च काय; पण ‘केबीजी’ आणि ‘सीआयए’मार्फत चौकशी केली तरी फरक पडत नाही. कोरोनाबाबत राज्य सरकार जागरूक आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात 

सर्वाधिक टेस्टिंग होत असल्यामुळेच महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या जास्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये लसीकरणाचे काम सुरू व्हावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलले तसेच हाफकिन इन्स्टिट्यूटलाही त्यांनी भेट दिली. 

यावेळी संपर्कप्रमुख भाउसाहेब चौधरी, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, महानगपप्रमुख सुधाकर बडगुजर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, शोभा मगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT