Shocking : Three brothers die due to corona in Daund taluka
Shocking : Three brothers die due to corona in Daund taluka 
मुख्य बातम्या मोबाईल

धक्कादायक : आठवडाभरात तीन सख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू 

अमर परदेशी

पाटस (जि. पुणे) : मागील काही दिवसांत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग दौंड तालुक्‍यातही लक्षणीयरित्या दिसून येत आहे. विशेषतः पुणे-सोलापूर महामार्गावर गाव असलेल्या पाटस परिसरात मागील वीस दिवसांत तब्बल 21 जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन सख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पाटस परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला असून त्यांनी उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. 


कोरोनाच्या विषाणूने दौंड तालुक्‍यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा डोके वर काढले आहे. महामार्गालगत गाव असलेल्या पाटस परिसरात मागील वीस दिवसांत तब्बल 21 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये एकाच कुटंबातील अकरा जणांचा समावेश आहे. कोरोनाबाधीत झालेले बहुतांश नागरिक ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, संसर्ग झालेल्या तीन सख्या भावांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. गेल्या आठ दिवसांत ठराविक दिवसांच्या अंतराने (19, 21 आणि 25 फेब्रुवारी) तीनही भावांचा मृत्यू झाला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने पाटस परिसर हादरून गेला आहे. 


सध्या पाटस गावातील एकुण 21 रुग्णांपैकी पाच जणांवर उपचार सुरू आहेत. इतर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून दौंड तालुक्‍याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबातील व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप आदी आजार आहे का? याची माहीती घेतली जात आहे. याबाबतची माहिती आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली. 

कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत सरपंच अवंतिका शितोळे यांनी सांगितले की, नागरीक, व्यापाऱ्यांना मास्क वापरणे, ठराविक कालावधीनंतर हात धुणे, गर्दी टाळणे याबाबतचे आवाहन केले आहे. नागरिकांनी काही त्रास होत असल्यास आरोग्य विभागाशी स्वतःहून संपर्क साधावा. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आठवडे बाजारात योग्य नियोजन केले जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT