... So Devendra Fadnavis was kept away from power by his superiors
... So Devendra Fadnavis was kept away from power by his superiors 
मुख्य बातम्या मोबाईल

...म्हणून देवेंद्र फडणवीसांना वरिष्ठांनीच सत्तेपासून दूर ठेवले

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : ‘दिल्लीतील भाजपचे मंत्री, खासदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेहमी कौतुक करतात. ज्या पद्धतीने सत्तेची हाव धरून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, त्याला दिल्लीकर झुकले नाहीत. अशा सत्तापिपासू व्यक्तीला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय दिल्ली चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही; म्हणून फडणवीसांना वरिष्ठांनी सत्तेपासून दूर ठेवले,’ असा चिमटा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला.

रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेवेळी बोलत होते. ‘‘नारायण राणेंचा पायगुण वाईट आहे. राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाची सत्ता जाते, ती कधी परत येत नाही. त्यांनी गद्दारीबाबत बोलणे म्हणजे राजकारणातील मोठा विनोद आहे. आम्ही गप्प बसणार नाही. महसूलमंत्री असताना नारायण राणे यांनी केलेले जमीन घोटाळे बाहेर काढू,’’ अशा शब्दांत खासदार राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केली. 

राऊत म्हणाले की, नारायण राणेंनी फक्त मिटक्‍या मारत बसावे. त्यांना सत्ता काय किंवा सत्तेतील सहभाग काय, आता या आयुष्यात मिळणं शक्‍य नाही. गद्दारीवर नारायण राणेंनी बोलावे यासारखा राजकारणातला दुसरा विनोद नाही. शिवसेनेबरोबर केलेली गद्दारी, कॉंग्रेसबरोबर केलेली गद्दारी, त्याशिवाय देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहा असोत, यांना त्यांनी घाणेरड्या शब्दांत फटकारले आहे. हे सुद्धा कधीतरी देवेंद्र फडणवीस यांनी काढून वाचलं तर खूप बरं होईल. 

‘चौकशी करायची असेल तर ईडीने नारायण राणेंच्या संपत्तीची चौकशी करावी. भाजपच्या किमान शंभर जणांची नावं आम्ही देऊ शकतो. ईडीने त्यांची चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे. आता भ्रष्टाचार बाहेर यायला सुरुवात झाली आहे. हायब्रीड अम्युनिटी या केंद्र सरकारच्या योजनेत रस्त्यांच्या संदर्भात झालेला महाभ्रष्टाचार घोटाळा हा देखील आम्ही समोर आणला आहे. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे राऊत यांनी नमूद केले.


त्यांना वाटत होतं की आपणच खुर्चीवर चिकटून बसू 

सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मंडळी सत्ता न मिळाल्यामुळे सैरभैर होऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. अस वाटत होतं की, या खुर्चीवर आपण चिकटून बसू. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्रातील सुदैवाने तसं घडले नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT