rajendra kondhare.jpg
rajendra kondhare.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

`मराठा समाजाच्या विरोधात सरकारमधील काही विशिष्ट अधिकारी`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मराठा समाजाला मान्य झालेले लाभ कसे मिळणार नाहीत, यासाठी काही अधिकाऱ्यांची लाॅबी कार्यरत असल्याचा आरोप मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. सारथी संस्था असो की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा परतावा असो, याबाबत नकारार्थी निर्णय घेतले गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारबाबत नाराजी वाढत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाला स्थगिती आणि त्यानंतरची परिस्थिती याबाबत सांगताना कोंढरे म्हणाले की मराठा समाजासाठी अनेक घोषणा झाल्या. प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळाला नाही. तो मिळू नये यासाठी काही अधिकारी प्रयत्न करत आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय असो की सारथी संस्थेचा `तारादूत` सारखा प्रकल्प रखडणे  असो यामागे हे अधिकारी कारणीभूत आहेत. राज्य सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांना वारंवार सांगूनही त्यावर कारवाई होत नाही. मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन झाले. त्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा झाली. त्यावर देखील काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हे सरकार आल्यापासून मराठा समाजाच्या मागण्यांना पाने पुसली जात असल्याचा समज निर्माण झाला आहे. त्यात आरक्षण रद्द झाल्याने या नाराजीत आणखी भर पडली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाने मंजूर केलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यासाठी सरकारने तरतूदच न करणे, याचा अर्थ काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पुन्हा मराठा क्रांती मोर्चे निघणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की अद्याप गावोगावी अजून बैठका सुरू आहेत. त्यामुळे यावर निर्णय झालेला नाही. मात्र समाजात खदखद आहे. याची दखल सरकारला घ्यावी लागेल. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने काय करायला हवे, याबाबतचे एक टिपण आम्ही उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत मराठा आरक्षण मंत्रीमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवणार आहोत. त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणे झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञाच्या सहकार्याने हे टिपण केले आहे. त्यामुळे आता जे प्रवेश मराठा आरक्षणांतर्गत झाले आहेत, ते टिकले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील विविध मराठा संघटनांनी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने भूमिका मांडताना मराठा तरुणांना नक्षलवादाकडे ढकलू नका, असा इशारा दिला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT