rahul9.jpg
rahul9.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

अमेरिकेत सत्तांतर झाले, बिहारमध्ये आता सत्तांतर होणार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमेरिकेत नुकतेच सत्तांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. "जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे. हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले, तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत," असा टोला अग्रलेखातून भाजपला हाणला आहे. 


डोनाल्ट ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यासाठी थापांचा पाऊसच पाडला. एकही आश्वासन, वचन ते पूर्ण करू शकले नाहीत. अमेरिकेत आज बेरोजगारीची महामारी कोरोनापेक्षा भारी आहे, पण त्यावर उपाय करण्यापेक्षा ट्रम्प फालतू विनोद, माकडचेष्टा व राजकीय लफंगेगिरीलाच महत्त्व देत आले. शेवटी लोकांनी त्यांना घरी पाठवले, असे सांगत बिहारमध्ये आता सत्तांतर होणार असल्याचे संकेत आजच्या अग्रलेखात देण्यात आले आहेत. 

पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ‘‘आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!’’ अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच! जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असे अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले आहे. 

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात..

  1. अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. 
  2. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने जिंकले आहेत. 
  3. बिहारच्यानिवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. 
  4. ट्रम्प यांना ऐन ‘कोरोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले.
  5. बायडन हे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंध कृती योजना मांडणार आहेत.  
  6. अनेक मोठय़ा राज्यांनी ट्रम्प यांना नाकारले. ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे. 
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT