मुख्य बातम्या मोबाईल

हात लावेल त्याचं सोनं करणारे सुधाकरपंत

अभय दिवाणजी

कोणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्ट, परखड बोलणे, आपल्या कार्यपद्धतीतून संस्थांना दिशा देणे, नवोदितांना मार्गदर्शक अशी भूमिका वठविणारा आधारवड गेल्याने सहकार, समाजकारण पोरके झाले आहे. 

पंढरपुरात विठ्ठल मंदिरानजिकच पंतांचे घर... विठ्ठलाच्या दर्शनानंतर पंतांच्या चरणाला स्पर्श करूनच दिनक्रम सुरू करणारे कार्यकर्ते, राजकारणाबरोबरच राजकारणविरहित माणसांचा मोठाच गोतावळा, जनसंपर्काचं बलस्थान, विविध संस्थांची मांदियाळी असं सारं चित्र पंतांच्या अवतीभोवती दिसत असे. 

सुधाकर परिचारक यांची पंत, मालक, श्रीमंत अशी ओळख... पंतांशी मैत्री करायला वयाची अट नव्हती, हा स्वानुभव... कोणत्याही विषयात पीएच.डी. पण कसलाही बडेजाव न करणारे पंत माध्यमांसमोर कधीही येत नसत. माध्यम प्रतिनिधींना पंतांची मुलाखत घेणे सहजशक्‍य नव्हतेच किंबहुना "न घेतलेली मुलाखतच' असे. (कै.) वसंतदादा पाटील, (कै.) शंकरराव मोहिते-पाटील, (कै.) नामदेवराव जगताप, (कै.) ब्रह्मदेव माने, (कै.) बाबुराव चाकोते, (कै.) भाई एस. एम. देशमुख, (कै.) बाबुरावअण्णा पाटील-अनगरकर, गणपतराव देशमुख, शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील. सुशीलकुमार शिंदे (यादी फारच लांबेल) अशा दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. 

1999 मध्ये राष्ट्रवादीची निर्मिती झाली, तेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांना पक्षात आणण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. शरद पवार यांना स्पष्टपणे बोलून मनमोकळे करणाऱ्या पंतांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडली होती. तब्बल म्हणजे 25 वर्षे आमदार असलेल्या या पंतांनी पदाचा कधीही बडेजाव केला नाही. विजयदादांसाठी मतदारसंघ सोडण्याचा त्याग करणारे पंत शांत, संयमी, सालस असे नेते होते. गेली 50 वर्षे राजकारण, समाजकारणात सक्रीय होते. सकाळी सर्वप्रथम पूजापाठ करणारे पंत सार्वजनिक जीवनात कधीही जात-धर्म-पंथ मानत नसत. 

देव-धर्म उंबऱ्यातच ठेवणाऱ्या पंताचे शेतकरी, कष्टकरी, कामगार, पिडीत, मागासलेले हे अत्यंत जवळीकतेचे विषय होते. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या उमेदवारीसाठी ते आग्रही असत. (कै.) विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतांकडे एस.टी. महामंडळाचे अध्यक्षपद दिले. गोत्यात अडकलेल्या एसटीची चाके बाहेर काढण्यासाठी "पंतरुपी' उपाय केला. भीमा, दामाजी सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढला. पांडुरंग कारखान्याच्या रुपाने शेतकऱ्यांचा खराखुरा राजवाडाच उभा केला. सहकारातील महामेरु म्हणून त्यांचा उल्लेख होतो. जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारा म्हणून ओळख असलेला पांडूरंग सहकारी साखर कारखाना, दामाजी, भीमा सहकारी साखर कारखाना, युटोपियन शुगर, पंढरपूर अर्बन बॅंक, कर्मयोगी विद्यानिकेतन, दूध उत्पादक संघ, सहकारी सोसायट्यांचे ते आधारवडच होते. या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार मिळवून दिला. 

तब्येतीबाबत नेहमीच जागरुक असलेले पंत दुसऱ्यांच्या प्रकृतीविषयी नेहमीच चौकशी करत. विशेषतः मधुमेहाशी संबंधित व्यक्ती भेटला की डॉक्‍टर कुठला, गोळी कुठली, व्यायाम काय करता हे चर्चेचे विषय असत. तालिका सभापती असताना सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांना पुरेसा वेळ देऊन त्यांनी सभागृहात अजातशत्रू अशी प्रतिमा निर्माण केली. सध्या सर्वत्र सहकार मोडीत निघत असताना त्यांच्या नेतृत्वाखालील पंढरपूर बॅंकेने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत नुकताच शतकोत्तर महोत्सव पार पाडला.

 बैलपोळ्याच्या सणाला ऊस उत्पादकांना काहीतरी रक्कम दिलीच पाहिजे, या मताचे ते होते. इतर कारखाने हा हप्ता देण्यास टाळाटाळ करत तेव्हांही पंतांनी कर्ज काढून पांडुरंग कारखान्यास ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना पोळ्यानिमित्तचा हप्ता दिला. कार्बन उत्पादनातून करोडो रूपये कमवून त्यांनी राज्यात काय पहिल्या तीनमध्ये उसाला दर दिला. कार्बन उत्पादन करणारा पांडुरंग हा देशातील पहिला कारखाना ठरला. 

साधे राहाणीमान, वैयक्तिक टीकाटिप्पणी, गॉसिपिंग न करणे, लहानग्यासही आदरार्थी बोलणे, वेळेचे पक्के, त्या कार्यक्रमाच्या संयोजकांशी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर चर्चा करणे यामुळे त्यांची राजकीय कमान सतत उंचावत गेली. त्यांच्या जाण्याने अनेक संस्थांचा वडीलकीचा आधार गेला. ज्यांच्या चरणी लीन व्हावे, असा कुटुंबप्रमुख गेला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT