Sugar Factories of Three Big Leaders in Trouble
Sugar Factories of Three Big Leaders in Trouble 
मुख्य बातम्या मोबाईल

BIG BREAKING! माजी मंत्र्यांच्या 'या' साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून जप्तीची नोटीस

तात्या लांडगे

सोलापूर : मागील हंगामात राज्यातील १४४ कारखान्यांनी ५४५.८३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. १२ हजार ७८५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एफआरपीपैकी ७८० कोटी रुपयांची एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान,६० टक्‍क्‍यांपेक्षाही कमी एफआरपी दिल्याने राज्यातील १५ साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने जप्तीची (आरआरसी) नोटीस बजावली आहे. त्यामध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, विनय कोरे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांशी संबंधित कारखान्यांचा समावेश आहे.

शेतातून ऊस तोडल्यापासून १४ दिवसांत संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीची पूर्ण रक्कम देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. तरीही गाळप हंगाम संपून आता एक ते तीन महिने झाले, तरीही १४४ पैकी ८६ कारखान्यांनीच शंभर  टक्के एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. ८० ते ९९.९९ टक्के एफआरपीची रक्कम २९ साखर कारखान्यांनी तर ६० ते ८० टक्के रक्कम १४ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांच्या खात्यात वितरित केली आहे.

१५ कारखान्यांनी दिली ४० टक्के एफआरपी

दुसरीकडे १५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांकडून गाळपासाठी घेऊन ६० ते ७० दिवसांचा कालावधी संपला आहे. तरीही या साखर कारखान्यांनी १ मेपर्यंत ऊस उत्पादकांना ४० टक्‍क्‍यांपर्यंत एफआरपीची रक्कम दिली आहे. त्यामुळे या पंधरा कारखान्यांना साखर आयुक्तालयाने आपल्या कारखान्यावर 'आरआरसी' कायद्याअंतर्गत जप्तीची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली आहे.

या १५ साखर कारखान्यांचा आहे समावेश

भोगावती साखर कारखाना (कोल्हापूर), वारणा शुगर, महाडिक शुगर (कोल्हापूर), शरयू शुगर (सातारा), लोकमंगल अग्रो, लोकमंगल शुगर, भैरवनाथ शुगर २ व३ (सोलापूर), भैरवनाथ शुगर (उस्मानाबाद), युटेक शुगर (नगर), माजलगाव शुगर, जय भवानी शुगर (बीड), साईबाबा शुगर, (नांदेड), महात्मा शुगर (वर्धा) वैनगंगा साखर कारखाना (भंडारा)

४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई

साखर हंगाम संपून आता ४० दिवसांत हून अधिक कालावधी झाला आहे. वास्तविक पाहता ऊस उत्पादकांना १४ दिवसांत एफ आर पी ची पूर्ण रक्कम देणे बंधनकारक आहे. तरीही आत्तापर्यंत १४४ साखर कारखान्यांपैकी ८६ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या १५ साखर कारखान्यांना आरआरसीअंतर्गत नोटीस बजावली असून त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती साखर आयुक्तालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT