मुख्य बातम्या मोबाईल

नोकरी करत त्याने `अशी` क्रॅक केली पहिल्‍याच प्रयत्‍नात `यूपीएससी`

सरकारनामा ब्युरो

नाशिक : वडील रिक्षाचालक, घऱची आबाळ, अशा सामान्‍य परिस्‍थिती असताना मुलांना खूप शिकविण्याचे ध्येय ठेवले होते. माझी जी काही संपत्ती आहे, ती मुलेच आहे, असे समजून त्‍यांच्‍या शिक्षणावर खर्च केला. आज मुलाने मिळविलेल्‍या यशाने भारावून गेलो आहे,  ही प्रतिक्रीया आहे, `यूपीएससी` परिक्षेतील यशस्वी स्वप्नील पवारचे वडील.जगन्नाथ  पवार यांची.

सामान्‍य रिक्षाचालक जगन्नाथ पवार यांचा मुलगा स्‍वप्‍नील याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळवले. प्रकल्‍प अभियंतापदावर नोकरीची जबाबदारी सांभाळून अभ्यासातही सातत्य ठेवत स्‍वप्‍नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळवत अधिकारीपदाला गवसणी घातली. 

निकाल जाहीर होताच पवार कुटुंबीयांनी औक्षण करत, पेढा भरवत स्‍वप्‍नीलचे अभिनंदन केले. आई कल्‍पना पवार या वेळी काहीशा भावूक झाल्‍या होत्‍या. अगदी शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार असलेल्‍या स्‍वप्‍नीलने पेठे विद्यालयातून दहावीत ९३ टक्‍के गुण मिळविले होते. भरपूर शिकण्याच्‍या त्‍याच्‍या जिद्दीपुढे आर्थिक अडचणीसह अनेक गतिरोधक होते. परंतु, अडथळ्यांची ही शर्यत पार करत समाजातील दात्‍यांच्‍या पाठबळावर स्‍वप्‍नीलने शिकण्याच्‍या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.

केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीनंतर जेईई परीक्षेच्‍या माध्यमातून पुण्यातील विश्‍वकर्मा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना प्‍लेसमेंटच्‍या माध्यमातून त्‍याला नोकरीदेखील लागली. अनुभव घेण्याच्या उद्देशाने साधारण दीड वर्षापूर्वी तो फॅब्‍स इंटरनॅशनलमध्ये प्रकल्‍प अभियंता म्‍हणून रुजू झाला. दिवसभर नोकरी करायची आणि मिळेल त्‍या वेळेत दिवसभरात सरासरी चार तास अभ्यास करायचा, अशा सातत्यातून स्वप्नीलने पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. २४ तास अभ्यासात व्‍यस्‍त राहाण्यापेक्षा वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करत कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने उमेदवारांनी अभ्यास करावा. उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर करता आला पाहिजे, असे स्‍वप्‍नीलने सांगितले. स्‍पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना प्रा. राम खैरनार यांनी मुलाखत तंत्रविषयक मार्गदर्शन केल्‍याचे त्याने सांगितले. 
...
यूपीएससी परीक्षा देत इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे ध्येय ठेवले होते. पहिल्‍याच प्रयत्‍नात यश मिळाल्‍याने विशेष आनंद होतोय. आजवरच्‍या प्रवासात आई-वडिलांसह ज्‍यांनी ज्यांनी पाठबळ दिले, त्‍यांच्‍याप्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करावीशी वाटते.  - स्‍वप्‍नील पवार 
-- 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=Bc8GGgb4Yi0AX98pX8O&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=c755d1f26a3d7697fcd3133ca35b8b62&oe=5F509EA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT