Tariq Anwar.jpg
Tariq Anwar.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

बिहारमधील काँग्रेसच्या पराभवाबाबत  तारिक अन्वर म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली  :  बिहारमधील पराभवाबद्दल काँग्रेसचे विश्लेषण सुरू झाले आहे. या निकालांचा सविस्तर आढावा कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असे पक्षातर्फे  सांगण्यात आले आहे. मात्र, महाआघाडीच्या पराभवाचे खापर फक्त आपल्यावर फुटू नये यासाठी जागा वाटपातील गोंधळाचे कारणही काँग्रेसने पुन्हा पुढे केले आहे.

काँग्रेसला बिहारमध्ये ७० जागा लढवून अवघ्या १९ जागा जिंकता आल्या आहेत. निराशाजनक निकाल हाती येताच काँग्रेसने महाआघाडीतील जागा वाटपामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा युक्तिवाद सुरू केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी निकालावर भाष्य करताना, बिहारमध्ये महाआघाडीचे जागा वाटप वेळेत झाले असते तर निकाल वेगळा लागला असता, असे म्हटले आहे. 

महाआघाडीत राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसला दिलेल्या ७० पैकी ६३ जागा भाजपची ताकद असलेल्या मतदारसंघातील होत्या असे पक्षातून सांगण्यात आले होते. तारिक अन्वर म्हणाले, "बिहारमध्ये महाआघाडीचे जागा वाटप वेळेत झाले असते तर निकाल वेगळा लागला असता. काँग्रेसने यातून धडा घ्यावा आणि आगामी निवडणूकांमध्ये आधीच जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्लाही दिला आहे. पुढच्या टप्प्यात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीच्या निवडणूका आहेत." 
 
बिहारमधील बडा राजकीय चेहरा मानले जाणारे तारिक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर कार्यकारिणीमध्ये सरचिटणीसपद आणि केरळचे प्रभारीपद मिळालेल्या तारिक अन्वर यांच्याकडे बिहारच्या निवडणूकीतील व्यवस्थापनाचीही जबाबदारी नेतृत्वाने सोपविली होती. बिहारमधील प्रचाराच्या रणनितीवरही त्यांनी सूचक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बिहारमध्ये ७० पैकी किमान  निम्मे जागा जिंकण्याची अपेक्षा काँग्रेसला होती. 
 
कार्यकारिणीच्या बैठकीवर निर्णय नाही 
मागील आठवड्यात काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी बिहारमधील पराभव निराशाजनक असल्याचे म्हटले होते. तसेच या निकालाचा पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सविस्तर आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर सविस्तर भूमिकाही मांडली जाईल, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते. अद्याप कार्यकारिणीच्या बैठकीवर निर्णय झालेला नाही. दिवाळी, छठ पूजेनंतर कार्यकारिणीची बैठक होण्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT