Theft of ashes and bones for the sake of gold after cremation at Haveli Taluka
Theft of ashes and bones for the sake of gold after cremation at Haveli Taluka  
मुख्य बातम्या मोबाईल

मरणाने केली सुटका...पण हव्यासाने पुन्हा छळले!

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (जि. पुणे) : हिंदू धर्मात अंत्यसंस्करानंतर अस्थीविसर्जन हा विधी महत्वाचा मानला जातो. मात्र मागील काही महिन्यापासून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवा़डी, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेतून सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवून नेण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे पूर्व हवेलीतील नागरीकांना आपल्या आप्तेष्ठांच्या अस्थिविसर्जन या विधीला मुकावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. (Theft of ashes and bones for the sake of gold after cremation at Haveli Taluka) 

पूर्व हवेली तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या लोणी कॉर्नर येथील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर राखेतील सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख व अस्थी मध्यरात्री पळवून नेण्याच्या घटना मागील काही महिन्यांपासून वारंवार घडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींनी मृतदेहाची राख व अस्थींची  पळवापळव होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे. 

हिंदू धर्मात अंत्यसंस्करानंतर अस्थीविसर्जन हा विधी  महत्वाचा मानला जातो. अंत्यसंस्कार ते सावडणे या दरम्यान एक रात्र असते. अंत्यसंस्कार केलेला मृतदेह जर महिलेचा असेल तर स्मशानभूमीतील राख व अस्थी हमखास चोरीला जात आहेत. पूर्व हवेलीमधील इतर गावांच्या तुलनेत लोणी काळभोर व उरुळी कांचन या दोन्ही गावांत असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. 

पूर्व हवेलीत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन अशी दहाहून अधिक आर्थिकदृष्ट्या दोन सधन गावे आहेत. दोन्ही ग्रामपंचायती पुणे शहराच्या शेजारी असल्याने परिसरात नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात परिसरातील बरेच नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातील काही नागरिक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, तर काही नागरिक वृद्धापकाळाने किंवा इतर आजाराने मरण पावले आहेत. 
  
याबाबत कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल वेदपाठक म्हणाले, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ग्रामपंचायतींसाठी पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी कॉर्नरला असलेल्या स्मशानभूमितून मागील काही महिन्यांपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री या मृतदेहाची राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मृतदेह जर महिलेचा असेल तर स्मशानभूमीतील राख व अस्थी चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. 

सुरवातीला हा प्रकार चुकून झाला असेल म्हणून नागरिकांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु आता हे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या घरातील महिला मरण पावली असेल तर हा प्रकार सहसा होत नाही. परंतू जर बाहेरगावाहून येऊन येथे रहाणाऱ्या कुटुंबातील महिला असेल तर नक्कीच मृतदेहाची राख व अस्थी चोरुन नेण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींनी या संदर्भात प्रतिबंधक उपाय योजून या घटना बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षारक्षक नेमणार 

याबाबत लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व उपसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या, स्मशानभूमीतून मृतदेहाची राख व अस्थी पळवापळवीबाबतच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. अंत्यसंस्करानंतर अस्थीविसर्जन हा विधी फार महत्वाचा व धार्मिक असल्याने या प्रकारच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्वरीत प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येणार आहेत. या ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार बंद होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT