Three doctors arrested in Pimpri-Chinchwad.jpg
Three doctors arrested in Pimpri-Chinchwad.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मोफत बेडकरिता एक लाख घेणाऱ्या तीन डॉक्टरांना अटक 

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : मोफत आयसीयू बेडसाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन डॉक्टरांना रविवारी अटक केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी आरोपींची नावे असल्याचे तपासाधिकारी महेश स्वामी यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा काल नोंदविण्यात आला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे त्यात फिर्यादी आहेत. डॉ. जाधव हे पिंपरी पालिकेच्या चिंचवड येथील ऑटोक्लस्टर कोविड सेंटरचा ठेका घेतलेल्या फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि.चे, तर बाकीचे दोन्ही डॉक्टर हे पद्मजा या खासगी रुग्णालयातील आहेत. तिघांनी मिळून पालिकेच्या वरील कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार व बेडची व्यवस्था असतानाही त्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील कोरोना सेंटरमध्ये २४ तारखेला ही धक्कादायक घटना घडली होती. येथे मोफत बेड व उपचाराची सोय असूनही त्यासाठी सुरेखा वाबळे या महिलेकडून एक लाख रुपये घेण्यात आले होते. ती ३० तारखेला उघडकीस आली. दरम्यान वाबळे या सेंटरमध्ये २८ तारखेला मृत्यू पावल्या होत्या. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यातील दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तर, पालिका सभेतही त्यावरून घमासान झाल्याने महापौर माई ढोरे यांनी प्रशासनाला कारवाईचा आदेश दिला होता.

शनिवारी सकाळी पिंपरी पालिकेत कोरोना आढावा घेण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या धक्कादायक प्रकरणी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर काही तासांतच प्रशासन हालले. दोषींविरुद्ध कडक कारवाईची लेखी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे शनिवारीच (ता.१ मे ) सायंकाळी केली. त्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात त्याच दिवशी यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अटकेचीही कारवाई झाली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT