Two BJP Corporators voted Shivsena Candidate in BMC
Two BJP Corporators voted Shivsena Candidate in BMC 
मुख्य बातम्या मोबाईल

मुंबई शिक्षण समिती निवडणूक : भाजपच्या दोन नगरसेविकांची मते शिवसेनेला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेत नुकत्याच झालेल्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेविकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्यानं ते मतदान अवैध  ठरले. भाजपच्या या दोन नगरसेवकांना पक्षाकडून 'कारणे दाखवा' नोटिस बजावण्यात येण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महापालिकेत शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आज आपली उमेदवारी मागे घेत शिवसेनेला मार्ग मोकळा करुन दिला व महाविकास आघाडीचा धर्म पाळला. काँग्रेसने हा अर्ज मागे घेतला नसता तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे करण्याचे मनसुबे रचले होते.

आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या संध्या दोशी यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली.  शिक्षण समिती अध्यक्षपद निवडणुकीत शिवसेनेतर्फे संध्या दोशी, भाजपकडून नगरसेविका सुरेखा पाटील, काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिक्षण समितीत शिवसेनेचे ११, भाजपचे ९, काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने संगीता हंडोरे यांचा अर्ज मागे घेतला. भाजपच्या सुरेखा पाटील यांना या निवडणुकीत पराभव झाला.

आज मतदान झाले त्यावेळी  भाजपच्या बिंदु त्रिवेदी आणि योगिता कोळी यांनी सुरुवातीला भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ हात वर करुन आवाजी मतदान केले. मात्र मतदानाची सही करताना शिवसेना उमेदवार संध्या दोषी यांच्या  नावासमोर सही केली. त्यामुळे भाजपची दोन मते वाया गेली. अवैध मतदान केलेल्या  या दोन्ही नगरसेविकांना भाजप कारणे दाखवा नोटिस बजावण्याची शक्यता आहे.

शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या सदस्याची स्थायी समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. स्थायी समितीत शिवसेना ११, भाजप १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेस यश मिळाल्याने स्थायी समितीमध्ये त्यांचे संख्याबळ १२ झाले आहे.

दरम्यान, या निवडणुकीबाबत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ''महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहेत . ही निवडणुक आधीच होणार होती. मात्र कोरोनामुळे ती थांबली होती. आता संध्या दोशी शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. राजकारणात मित्र हा शत्रू होत असतो आणि शत्रू हा मित्र होतो."

''मुंबई महापालिकेत शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्ष काँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकली.अध्यक्षपदाची उमेदवारीच मागे घेतली.अखेर अर्थपूर्ण समझोता झाला तर? आता स्पष्ट झालंय की खरा  विरोधी पक्ष कोण? काँग्रेस का साथ सेना का विकास ,'' अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते  प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT