Two Infants in Nashik Freed from Corona Virus.
Two Infants in Nashik Freed from Corona Virus. 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोनाला चीतपट करणाऱ्या तान्ह्या 'फायटर्स'चे छगन भुजबळांकडून कौतुक!

संतोष विंचू

येवला : कोरोना नावाच्या राक्षसाने, आजगरासारखे सापडेल त्याला गिळंकृत करण्याची मोहीमच हाती घेतली. त्याचे लक्ष्य प्रामुख्याने छोटी मुले आणि वयोवृद्ध. त्याला चीतपट करण्याची ताकद ठेवणारेही अनेक आहेत. मात्र, त्यात विशिष्ट वयोगटाचे प्राबल्य नाही, हेच सिद्ध केलंय इथल्या दोन निरागस बालकांनी. अवघ्या बारा आणि सोळा दिवसांची ही बालके 'रिअल फायटर्स' म्हणून कौतुकास पात्र ठरली आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्तीशः त्याची दखल घेत त्यांचे कौतुक केले. 

येथील दोन बालके कोरोनाबाधित असल्याचे २६ एप्रिलला स्पष्ट झाल्याने येवलेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण, पुढील १६ दिवसांत याच चिमुकल्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचाराला प्रतिसाद दिला अन्‌ मंगळवारी सुखरूप घरी पोचताच सर्वांना आश्‍चर्यचकीत केले. त्याच वेळी या चिमुकल्यांना पाहून अनेकांचे डोळेही पाणावले. येथील एका महिलेची मालेगावात झालेली प्रसूती कोरोनाच्या शिरकावाचे निमित्त ठरली. 

त्यानंतर २६ एप्रिलला तिच्याच कुटुंबातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, ज्या महिलेची मालेगावात प्रसूती झाली तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर तिचे १२ दिवसांचे अन्‌ तिच्या नणंदेचे १६ दिवसांचे बाळ मात्र कोरोनाच्या विळख्यात सापडले. पाचही जणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याने या कुटुंबातील संपर्क साखळी तुटली. पण, या चिमुकल्यांचे काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. 

दोन्ही बालकांसह कोरोनामुक्त झालेल्यांचे स्वागत

मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रशासनातर्फे दोन्ही बाळांसह सर्व कोरोनामुक्तांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व वैद्यकीय अधिकारी शैलजा कुप्पास्वामी यांनी या महिलेला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. येवलेकरांना लढण्याचा चांगला संदेश दिल्याची भावना व्यक्त केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, तहसीलदार रोहिदास वारुळे, नगरसेवक शफिक शेख, वसीम शेख आदी या वेळी उपस्थित होते. दरम्यान, १४ दिवसांत ग्रामीण रुग्णालयात आमची निष्ठेने सेवा करणाऱ्या परिचारिका आणि उपचार करणारे डॉक्‍टर यांच्या मेहनतीचा हा विजय असून, त्यांच्यामुळेच आम्ही या आजारातून बरे होऊन परतल्याची भावना व्यक्त करत या महिलेने परिचारिका दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. 

येथील सर्व रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत आहेत. येथील पहिली बाधित महिला येत्या एक दोन दिवसांत घरी परतण्याची शक्‍यता आहे. सर्व नागरिकांनी काळजी घेतल्यास आपण नक्कीच वाढत्या संख्येला आवर घालू शकतो. -शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक, येवला ग्रामीण रुग्णालय 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT