udyanraje news
udyanraje news 
मुख्य बातम्या मोबाईल

राजे, आता सॉरी बोलून काय उपयोग?

सरकारनामा ब्युरो

सातारा :  माजी खासदार उदयनराजे भोसले आणि कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे मंगळवारी एका लग्न समारंभात शेंद्रे येथे एकत्र आले. उदयनराजे यांनी शिंदेंची गळाभेट घेतली याबाबतची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उदयनराजे आणि शशिकांत शिंदे पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला उधाण आले. मात्र श्री. शिंदेनी ही भेट केवळ योगायोग होता राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळा आपल्या फेसबुक पेजवरून दिला आहे.

कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथील शिंदे यांचे कार्यकर्ते महादेव शेलार यांच्या घरातील  विवाह समारंभ सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे होता. यासाठी  शशिकांत शिंदे आले होते. त्यावेळी माजी खासदार उदयनराजे भोसले विवाह समारंभास उपस्थित राहिले. उदयनराजे आल्याचे पाहून शिंदेंना त्यांच्या कार्यकर्त्यानी उदयनराजे तेथे आल्याचे सांगितले. मात्र शशीकांत शिंदे यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र उदयनराजेंनी त्यांना डोळ्याने खुणावले. तरीही शिंदे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर उदयनराजेंनी शिंदे यांच्याजवळ येऊन त्यांना मिठी मारली आणि सॉरी माझी चूक झाली, असे म्हणाले. यावर शिंदेंनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मात्र उदयनराजे त्यांच्या शेजारीच उभे राहिले आणि पुन्हा एकदा त्यांनी सॉरी माझी चूक झाली असे म्हणाले. या दोघांच्या मिठीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आले. दोघेही पराभूत नेते आता पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

यासंदर्भात शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विवाह सोहळ्याच्या  ठिकाणी मी उभा असताना उदयनराजे तेथे आले व त्यांनी मला मिठी मारली. त्यांना मी कसलाच प्रतिसाद दिला नव्हता. यानंतर मी रागाच्या भरात तुम्ही स्वतःचे नुकसान केले, त्या बरोबर माझेही नुकसान केले, असे म्हणालो. मी वीस वर्षे सातत्याने संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे, संघर्ष करून पाय रोवून उभा आहे. राष्ट्रवादी सोडल्यामुळे स्वतः खासदारकीपासून दूर राहिला. मी जर निवडून आलो असतो तर मला मोठी संधी मिळाली असती. ती संधी तुमच्यामुळे गेली. राजे आता सॉरी बोलून उपयोग काय? तुम्ही स्वतःचे तर कधीही न भरून येणारे नुकसान करून घेतले आणि माझेही केले, असे म्हणाल्याचे शिंदे यांनी नमूद केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT