Vanchit Aghade Agitation about Farmers Issues
Vanchit Aghade Agitation about Farmers Issues 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या आंदोलनाविरुद्ध ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रती आंदोलन

मनोज भिवगडे

अकोला : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व कर्जवाटप महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब करावे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने शेताच्या बांधावर कर्जमुक्ती आंदोलन व ‘भाजपा से किसान बचाव’ अभियान राबविण्यात आले. भाजपवाल्यांच्या नाटकी आंदोलनास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, यासाठी हे आंदोलन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मागील दोन वर्षांत ज्या शेतकरी लोकांनी पीक कर्ज घेतले  त्या शेतकऱ्यांना शासनाने पीक कर्ज माफीमध्ये बसविले नाही. त्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी पात्र ठरविण्यात यावे, दोन लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे, त्यांना सुध्दा कर्ज माफी द्यावी, ज्या शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पण त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत शासनाने पैसे जमा केले नाहीत म्हणून ते शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत त्यांना सुध्दा त्वरीत लाभ व्हावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

''राज्यात कोरोनाचे संकट आहे. परंतु त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी-शेतमजूर यांना बसत आहे. केंद्र सरकारची थेट आर्थिक मदत ही बनवाबनवी होती. तशीच राज्य सरकारच्या कर्जमाफी व पीक कर्ज तसेच ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे,'' असे सांगत वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी भाजपाचे आंदोलन नाटकी असून, त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन ‘वंचित’चे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी केले आहे.

सत्ता असताना शाहणपण सुचले नाही
राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावी व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. परंतु, त्यांच्या सरकारच्या काळात हे शहाणपण त्यांनी का दाखविले नाही, असा सवाल ‘वंचित’ने विचारला आहे. शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून त्यांचे निवेदन भाजपतर्फे राज्य सरकारला सादर करणार आहे. हा निव्वळ स्टंट असून, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील भाजप व राज्यातील आघाडी सरकार सारखेच जबाबदार आहे, असा आरोपही ‘वंचित’तर्फे करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT