ashok-chavan-maratha-demand
ashok-chavan-maratha-demand 
मुख्य बातम्या मोबाईल

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आघाडी सरकारच्या बैठकांवर बैठका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीच्या बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर श्री. चव्हाण बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्याबरोबर समितीचे सदस्य तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार, विधी विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे यांच्यासह न्यायालयात राज्य शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत येत्या बुधवारी 15 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात भक्कमपणे बाजू मांडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येत्या दोन -तीन दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मराठा समाजाशी संबंधित विविध योजना व सवलती, त्यांची अंमलबजावणी तसेच न्यायालयीन कामकाजाच्या तयारीबाबत विचार विनिमय केला जाणार आहे.

चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण व वैद्यकीय प्रवेशासंदर्भात बुधवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडून वैद्यकीय प्रवेशाला अंतरिम स्थगिती मिळू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील मूळ याचिकेवरील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष व्हावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

तसेच ‘सारथी’ आणि इतर अनेक विषयांसंदर्भात उद्या, गुरुवारी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे बैठक घेणार आहेत. मराठा समाजासाठी मागील शासनाच्या काळात घोषित परंतु अद्याप अंमलबजावणी न झालेल्या उपाययोजनाबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबतही या बैठकीत चर्चा होईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात समाजातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी उपसमितीची बैठक होणार आहे. आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासंदर्भात या प्रतिनिधींच्या सूचना उपसमिती जाणून घेणार आहे. त्याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीपूर्वी राज्य शासनाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञाबरोबरही येत्या शनिवारी उपसमितीची बैठक होणार असून यावेळी प्रामुख्याने बुधवारी होणाऱ्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Edited By- Yogesh Kute

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT