Vijaydada - Babanrao Avtade meeting failed; Siddheshwar Avtade insists on contesting elections
Vijaydada - Babanrao Avtade meeting failed; Siddheshwar Avtade insists on contesting elections  
मुख्य बातम्या मोबाईल

विजयदादा-बबनराव आवताडे यांची बैठक निष्फळ; सिद्धेश्वर आवताडे निवडणूक लढविण्यावर ठाम 

सरकारनामा ब्यूरो

पुणे  : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक आणि मंगळवेढ्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना एकत्र आणले खरे. मात्र, आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज भरून त्यावर पाणी फेरले आहे. समाधान आवताडे यांना घरातूनच मिळालेले आव्हान मोडीत काढण्यासाठी गुरुवारी (ता. १ एप्रिल) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बैठक घेतली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली असून सिद्धेश्वर आवताडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगून सायंकाळी जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. 

मंगळवेढा खरेदी विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने मंगळवेढा तालुक्यातील आवताडे समर्थकांची मात्र पंचाईत झाली आहे. कारण, या दोन्ही गटाचे गावोगावचे कार्यकर्ते एकच आहेत. त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहावे, असा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. 

दरम्यान, सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बबनराव अवताडे यांच्यासमवेत बैठक घेतली. मात्र, उमेदवारी मागे घेण्या नकार देत सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याची चर्चा आहे. 

मोहिते पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाल्यानंतरही सायंकाळी सिद्धेश्वर आवताडे यांनी आपला प्रचार कायम सुरू ठेवला आहे. त्यावरून आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे दिसून येत आहे. बबनराव आवताडे हे जिल्हा बँकेचे संचालक असून त्यांचे तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठे वजन आहे. याशिवाय विविध सहकारी संस्थांवरही त्यांचे वर्चस्व आहे. तसेच, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर यांची तरुणाई क्रेझ आहे. त्यामुळे सिद्धेश्वर यांच्या उमेदवारीचा फटका हा समाधान आवताडे यांनाच बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भाजपने व्यूहरचना केली आहे. त्यामुळे अवताडे व परिचारक यांच्या गटात समझोता करत उमेदवारी दिली. त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकार क्षेत्रावर वर्चस्व असलेल्या आवताडे यांना मानणारा वर्ग प्रत्येक गावात आहे. परंतु समाधान आवताडे यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे समर्थकांची अवस्था द्धिधा झाली. या दोन चुलत बंधूंमधील मतविभागणीचा परिणाम निकालावर होऊ शकतो, त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून बबनराव आवताडे यांच्याशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे माघारीपर्यंत सिद्धेश्वर आवताडे कोणता निर्णय घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT