2satej_patil_vishwajeet_kada.jpg
2satej_patil_vishwajeet_kada.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

लाड- असगावकरांच्या यशात जयंत पाटलांइतकाच विश्‍वजीत कदम- सतेज पाटलांचा वाटा..

उमेश घोंगडे

पुणे : भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरूद्ध भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असा सामना रंगला. यात जयंत पाटील यांना यश मिळाले. मात्र, या यशात सतेज पाटील व विश्‍वजीत कदम या कॉंग्रेसच्या दोन युवा नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे जयंत पाटील यांचे काम अधिक सोपे झाले यापेक्षाही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या दोन नेत्यांच्या रूपात कॉंग्रेसचे नेतृत्व उरले आहे. दोघांचेही तरूण नेतृत्व असून दोघेही राज्य मंत्रीमंडळात काम करीत आहेत. शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेले जयंत असगावकर व पदवीधरचे आमदार अरूण लाड यांच्या विजयात या दोघांचा वाटा मोठा आहे. कदम व पाटील या दोघांचे सहकारातील व शिक्षण संस्थांचे मोठे जाळे आहे. राज्यमंत्री कदम यांनी भारती विद्यापीठाची संपूर्ण ताकद लाड व असगावकर यांच्यामागे उभी केली. सतेज पाटील यांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील आपली संपूर्ण ताकद या दोन उमेदवारांच्या मागे लावली. 

असगावकर कॉंग्रेसचे तर लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. या निवडणुकीत जयंत पाटील यांच्याकडे महाआघाडीच्या नेतृत्वाची धुरा होती. मात्र, या विजयात जयंत पाटील यांच्या इतकाच या दोघांचा वाटा आहे. या यशाचा फायदा जितका राष्टवादीला होईल तितकाच फायदा कॉंग्रेसला होणार आहे. संघटना म्हणून राज्यातील कॉंग्रेसची अवस्था सध्या दयनीय आहे. राज्यातील सत्तेमुळे या पक्षाला एकप्रकारे संजीवनी मिळाली आहे. त्यातही कदम व पाटील यांच्या रूपाने संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंगेसला तरूण नेतृत्व मिळाले आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना सध्यातरी या दोघांचाच आधार आहे. या विजयामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. निवडणुकीतील या यशानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी अधिक आक्रमक होईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर पक्ष संघटना म्हणून राष्ट्रवादी अधिक मजबूत होण्याचा प्रयत्न करणार हे निश्‍चित. जयंत पाटील या दिशने नेहमीच प्रयत्नशील असतात. अशावेळी कॉंग्रेसला टिकवून ठेवत संघटना वाढविण्यासाठी या विजयाचा उपयोग करून घ्यायला हवा. राज्यमंत्री कदम व पाटील यांच्या रूपाने पश्‍चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेसजणांना नवी ताकद देण्याचे काम यापुढेही होत राहणे पक्षासाठी आवश्‍यक आहे. सत्तेतील मंत्रीपद व या निवडणुकीतील यशाचा उपयोग अंतीमत: कॉंग्रेस पक्ष संघटना यापुढेही अधिक मजबूत करण्यासाठी व्हायला पाहिजे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT