मुख्य बातम्या मोबाईल

विश्‍वास नांगरे पाटलांचा बॅंड चुकवतोय पोलिसांच्या काळजाचा ठोका !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात व्यस्त राहणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी राज्य सरकारपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आहे. त्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी पोलिसांच्या मनगटावर बांधायचा गोकी बॅंड दिला आहे. त्याने आरोग्याचा काही प्रश्‍न निर्माण झाल्यास या बॅंडचा गजर वाजतो अन्‌ संबंधित पोलिस डॉक्‍टरकडे जातात. मात्र सध्याच्या उन्हात रस्त्यावर ड्यूटी करणाऱ्या पोलिसांचा हा बॅंड कधीही गरम होतो अन्‌ वाजतो, त्यामुळे अनेक पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकतोय. 

नांगरे पाटील यांनी पोलिसांच्या फिटनेससाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या मनगटावर बांधण्यासाठी गोकी फिटनेस बॅंड हे घडयाळ दिले आहे. आयुक्त नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झाला. मात्र आता हा बॅंड डोकेदुखी ठरला आहे. उन्हात ड्यूटीवर असलेल्या पोलिसांचे शारीरिक तापमान वाढताच त्याचा गजर वाजतो अन्‌ पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्यांच्याकडून सरळ दवाखान्याचा रस्ता धरला जातो. 

कोरोनाचा संसर्ग, त्यात नित्याची ड्यूटी अशा वेळी फिटनेसचा विचार करून आयुक्तांनी पोलिसांच्या मनगटावर बांधण्यासाठी गोकी फिटनेस घड्याळ दिले आहे. यातून पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याना त्यांचे दैनंदिन शारीरिक तापमान, रक्तदाबाची माहिती, शारीरिक क्षमता टिकविण्यासाठी किती चालावे, याची माहिती मिळते. घड्याळ त्याचे काम व्यवस्थीत करत आहे. असे जरी असले, तरी त्यांना भरउन्हात काम करावे लागते. अशा वेळी त्यांच्या शारीरिक तापमानात वाढ होते.

दुसरीकडे शारीरिक तापमानाचा सरासरी आकडा घड्याळमध्ये फिट केलेला आहे. त्यापलीकडे तापमान जाताच संबंधितांना अलर्ट करण्यासाठी त्यातील गजर वाजण्यास सुरुवात होते. अशा वेळी कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांचे लक्ष त्यावर जाते. आपल्याला काही झाले तर नाही ना? या भीतीने बऱ्याच वेळा प्रत्यक्ष नसला तरी गजरमुळे त्यांचा रक्तदाब वाढतो. ते पोलिस ठाणे किंवा मग सावलीचे ठिकाण गाठतात. त्यात काही वेळानंतर शारीरिक तापमान सामान्य झाले, की मग पुन्हा अधिकारी, कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी परतात. या दरम्यान त्यांच्यात भीती असते. यामध्ये काही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता अनेक कर्मचाऱ्यानी बोलून दाखविली. 

कोरोना संसर्गामुळे सर्वांमध्ये भिती आहे. कोरोना झालेल्यांमध्ये तापाचे प्रमाण जास्त असते. कर्मचारी, अधिकारी भरउन्हात कर्तव्य बजावतात. विविध नागरिकांच्या संपर्कात येतात. अशा वेळी अचानक बॅंडचा गजर वाजला, की त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्यामुळे ते फिटनेसपेक्षा डोकेदुखी अधिक ठरत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT