bhr jalgaon
bhr jalgaon 
मुख्य बातम्या मोबाईल

खळबळजनक : BHR गैरव्यवहार प्रकरणी एका आमदाराच्या नावे वाॅरंट

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अवसायकाच्या कार्यकाळातील कोटींच्या गैरव्यवहारात दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत व्यावसायिक, उद्योजक, राजकीय कार्यकर्त्यांसह १२ जणांच्या अटकेनंतर आता जिल्ह्यातील एका आमदाराचे आर्थिक व्यवहार रडारवर असून आमदाराच्या नावे वॉरंट निघाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

दरम्यान, गुरुवारी अटक केलेल्या हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, डाळ उद्योजक प्रेम कोगटा यांच्यासह १२ जणांना काल व आज या दोन दिवसांत पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बीएचआर पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण थंड होत नाही तोच अवसायक नियुक्तीनंतरच्या काळातही त्यापेक्षा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन पुणे डेक्कन पोलिसांत याबाबत गुन्हे दाखल आहेत. आधीच्या टप्प्यात सीए, ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष, मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा मुलगा अशांना अटक झाली होती. आता नंतरच्या टप्प्यात १२ जणांना गुरुवारी अटक झाली.

आमदाराचे व्यवहार रडारवर

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी जळगावात दाखल झाले तेव्हा या पथकाकडे जिल्ह्यातील एका आमदाराने केलेले आर्थिक व्यवहार डोळ्यासमोर होते. आमदाराला ताब्यात घेण्यासाठी वॉरंटही पथकाकडे असल्याचे वृत्त आहे. मात्र, या कारवाईत माशी कुठे शिंकली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सर्वांना २२ पर्यंत कोठडी

याप्रकरणी आधीच्या टप्प्यातील अटकसत्रानंतर गुरुवारी १२ जणांना ताब्यात घेतले. पैकी अंबादास मानकापे (औरंगाबाद), प्रेम नारायण कोगटा व जयश्री अंतिम तोतला यांना गुरुवारीच न्यायालयात हजर केले असता २२ तारखेपर्यंत कोठडी सुनावली. तर उर्वरित भागवत भंगाळे, छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, आसिफ मुन्ना तेली, जयश्री मणियार, संजय तोतला, राजेश लोढा, प्रमोद कापसे व प्रीतेश जैन यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनाही २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT