13Saibaba_Shirdi_2H.jpg
13Saibaba_Shirdi_2H.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

साईबाबा समाधी मंदिराच्या तळघरात पाणी  

सरकारनामा ब्युरो

शिर्डी : यंदा अवघ्या दोन महिन्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. त्यामुळे साईबाबांच्या समाधीमंदिरातील तळघरात पाण्याचा पाझर सुरू झाला.  

अर्धा इंच व्यासाचे छोट्या ड्रील मशिनच्या साहाय्याने छिद्रे पाडून त्यात सिमेंटचे पाणी व रसायनांचे मिश्रण सोडून हा पाझर रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाझर अल्प असला तरी पाण्याच्या दाबामुळे तो पूर्णपणे बंद होत नाही. दररोज सुमारे पाचशे ते सातशे लिटर पाणी जमा होते, त्याचा उपसा केला जातो.
 
यापूर्वी 1998-99 च्या सुमारास कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने साईमंदिराच्या तळघराच्या भिंतीना ओलावा येऊन पाझर सुरू झाला होता. यंदा तर अवघ्या दोन महिन्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. अद्याप निम्मा पावसाळा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. साईसंस्थानला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या पाझराच्या समस्येतून मार्ग काढावा लागणार आहे.

या तळघरात बाबांच्या नित्यपुजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात. समाधीच्या उत्तर बाजुला हा पाझर सुरू आहे. या मंदिराच्या बांधकामाला शंभर वर्षे लोटली. त्यामुळे तळघरात कुठलेही काम करताना हादरे बसणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते.

साईसंस्थानचे यापूर्वीचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांच्या कार्यकाळात विशिष्ट प्रकारची पॉलीकेमिकल रसायने व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मंदिराचे मजबुतीकरण करण्यात आले. मात्र, तळघरात पाझर सुरू झाल्याने काळजी घ्यावी लागत आहे.

यंदा शिर्डी शहरात अवघ्या दोन महिन्यात तब्बल चारशे मिलीमीटर पाऊस झाला. यापूर्वी कमी वेळात एवढा पाऊस पडल्याची नोंद नाही. येथील पावसाची वार्षिक सरासरी साडे चारशे मिलीमीटर एवढी आहे. यावरून यंदाचा पावसाचा जोर लक्षात येतो. त्यामुळे सर्वत्र भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली.


बऱ्याच ठिकाणी विहिरी तुडुंब भरल्या, त्यातून हाताने पाणी घेता येईल अशी स्थिती आहे. मंदिराच्या चोहोबाजूंनी वाढलेल्या पाण्याच्या पातळीचा दाब वाढला. त्यातून हा हलका पाझर सुरू झाला. पूर्वी मंदिराजवळ आड होता. नुतनीकरण्याच्या वेळी तो बुजविण्यात आला. हा आड खोल करून अशा अडचणीच्या काळात त्यातून पाण्याचा उपसा सुरू ठेवला असता तर कदाचित ही पाझराची अडचण उदभवली नसती. असे जाणकारांचे मत आहे.
 
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT