We don't need NCP: Shiv Sena leader said 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीची आम्हाला गरज नाही : शिवसेनेच्या नेत्याने सुनावले

राष्ट्रवादीला खडे बोलही सुनावले.

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : राज्यात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत असली तरी अनेक समस्या किंवा प्रश्न हे सामंजस्याने सुटू शकतात. ठाणे महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांची आम्हाला गरज नाही, असे खडे बोल या वेळी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सुनावले. (We don't need NCP: Shiv Sena leader said)

ठाणे शहरात केवळ शिवसेनेच्या शाखांमध्येच लसीकरण शिबिरे आयोजित केली जातात. विरोधी पक्षासह इतर पक्षांना लसीकरणासाठी सावत्र वागणूक मिळते. खोळंबलेला नगरसेवक निधी आणि त्याविरोधात आवाज उठविणाऱ्या नगरसेवकांचा आवाज म्यूट करून होत असलेली मुस्काटदाबी या मनमानी विरोधात मंगळवारी पालिकेच्या ऑनलाईन महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राडा केला. विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही सभा उधळली. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीला खडे बोलही सुनावले.

हेही वाचा : शरद पवारांच्या टीकेबाबत राज्यपाल कोशियारी म्हणाले...
 
विकासकासंदर्भात महापालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दोन ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. त्या वेळी आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी ऑनलाईन महासभा सुरू असताना नरेंद्र बल्लाळ सभागृहात घोषणाबाजी करत प्रवेश करून महासभा उधळून लावली. 

 
नगरसेवकांचा आवाज दाबणाऱ्यांवर कारवाई करा

राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर, तसेच प्रशासनावर टीकेचा आसूड ओढला. ‘आमचे आंदोलन हे विकासकामांसाठी आहे. मात्र, विरोधकांनी आवाज उठविल्यास सचिवांकडून ऑनलाईन महासभेत नगरसेवकांचा आवाज म्यूट केला जात आहे. त्यामुळे सचिवांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे,’ असेही देसाई यांनी या वेळी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या गटनेत्याकडून विरोधी पक्षनेत्याची कोंडी 

महासभा सुरू होण्याआधी लसीकरण आणि बजेट मिळत नसल्याच्या मुद्द्यासह महासभेत आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आंदोलन केले. काही नगरसेवकांच्या वॉर्डात कोट्यवधीची कामे सुरू असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

त्या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. विकासकामे झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करून आंदोलन करण्याऐवजी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याच मुद्द्यावरून महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील आव्हाड यांच्या मतदारसंघात झालेल्या कामांची चौकशी शानू पठाण यांनाच करायला सांगितले असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षनेत्याची कोंडी झाल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT