सांगली : सांगली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या सहा नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीची मुदत उद्या (सोमवारी, ता. ८ मार्च) संपत आहे. या नगरसेवकांच्या उत्तराकडे पक्षाचे लक्ष लागले असून त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्या पुढच्या कारवाईचीही तयारी केल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिली.
महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या चार नगरसेवकांनी थेट विरोधात मतदान केले, तर दोघे गैरहजर राहिले होते. यामुळे भाजपची महापालिकेतील सत्ता संपुष्टात येवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर, तर कॉंग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर झाले आहेत. व्हीप बजावलेल्या सहा नगरसेवकांना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आणि महापालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी कायदेशीर नोटीस बजावली होती.
भाजपच्या चिन्हावर, जीवावर निवडून आलात, तरीही पक्षाशी गद्दारी का केलीत? असा थेट सवाल यात विचारण्यात आला होता. पक्षविरोधी कारवाई केल्याने कायद्यानुसार तुम्हाला अपात्र करण्यात येणार असल्याचेही यामध्ये म्हटले होते. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आठ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले की, महापौर, उपमहापौर निवडणुकीत विरोधी पक्षाने घोडेबाजार करून आमचे नगरसेवक फोडले. या फुटीर नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अर्पणा कदम, नसीमा नाईक, शिवाजी दुर्वे व आनंदा देवमाने यांना रविवारी (ता. ७ मार्च) नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंत (ता. ८ मार्च) मुदत देण्यात आली आहे. त्यांचे उत्तर काय येते पाहू. नाही तर पुढची कारवाई त्यांच्यावर करण्याची तयारी आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.