When will Ramdas Athavale give justice to Pappu Kagde?
When will Ramdas Athavale give justice to Pappu Kagde? 
मुख्य बातम्या मोबाईल

पक्षासाठी नोकरी सोडणाऱ्या पप्पू कागदेंना आठवले न्याय कधी देणार? 

दत्ता देशमुख

बीड : ओठावर मिशाही नसताना दलित पॅंथरचा कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली आणि मग रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शाखाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशी यशस्वी वाटचाल केली. विशेष म्हणजे, तत्पूर्वी त्यांची इंडियन नेव्हीत शिपाई पदावरही निवड झाली होती. मात्र, पॅंथर चळवळीत मन रमलेल्या पप्पू कागदेंनी पॅंथर चळवळीचा निळा झेंडा खांद्यावरून पडूच दिला नाही. त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याने मागच्या 22 वर्षांपासून रिपाइंचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे. दलित चळवळीत अग्रेसर असलेल्या पप्पू कागदे यांचा इतर समाजाशी सुसंवाद आहे. 

कागदे हे शिक्षित कुटूंबातून असून त्यांचे वडील परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीस होते. तेही कट्टर पॅंथर चळवळीतले. त्यामुळे चळवळीचे बाळकडू पप्पू कागदे यांना घरातूनच मिळाले. उच्च माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच रामदास आठवले यांच्या आकर्षणापोटी ते दलित चळवळीकडे ओढले गेले. वयाच्या 17 व्या वर्षी ते भीमराजनगर शाखेचे अध्यक्ष झाले. 

अभ्यासात हुशार असलेल्या पप्पू कागदे यांनी इंडियन नेव्हीत शिपाई पदाच्या भरतीसाठी नगर येथे दोन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पुण्यात परीक्षा दिली. मात्र, रुजू होण्यासाठी मात्र त्यांचे मन धजावले नाही. आपली शैक्षणिक कागदपत्रे नेव्ही कार्यालयात सोडून त्यांनी पुन्हा बीड गाठले आणि आपले काम सुरू ठेवले.

दरम्यान, आठवलेंचे आकर्षण असलेल्या कागदे यांची त्यांच्यासोबत 1995 ला भेट झाली. त्यांच्या शहराध्यक्षपदाच्या मागणीतील कॉन्फिडन्स पाहून आठवलेंनी तत्काळ शहराध्यक्षपदाची माळ कागदेंच्या गळ्यात घातली. 

त्यानंतर काही काळाने 22 व्या वर्षी त्यांच्या गळ्यात पडलेली माळ अद्यापही कायम आहे. पप्पू कागदे यांनी भूमिमुक्ती परिषद चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजार एकर जमीन संबंधितांना मिळवून दिली आहे. 

महाराष्ट्रातील रामदास आठवलेंच्या प्रत्येक कार्यक्रमात पप्पू कागदे सावलीसारखे सोबत असतात. राजकीय भूमिका वेगळी असली तरी जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

दलित चळवळीत आघाडीवर असले तरी इतर समाजाशीही त्यांचा सुसंवाद असतो. जिल्ह्यात वा गाव पातळीवरील कुठल्याही कुरबुरी असोत वा दोन समाजातील भांडण असले तरी समोपचाराने तोडगा काढण्यावर त्यांचा कायम भर असतो.

त्यांनी बीडमध्ये भव्य संविधान फेरी काढून आपल्या संघटन कौशल्याची झलक रामदास आठवलेंना दाखविली. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चाला त्यांनी आठवलेंना बीडमध्ये आणले होते. 

कसत असलेल्यांना गायरान देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात समर्थकांना अटक, नगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या वेतन प्रश्नासाठी तब्बल 54 दिवस साखळी उपोषण, दलित वस्ती हल्ला प्रकरणी जिल्हा बंद आंदोलनामुळे चार पोलिसांचे निलंबन, दलित हक्क परिषद, दलित मुक्ती परिषद, खासगी क्षेत्रातील आरक्षणासाठी आंदोलन, जिल्ह्यातील 850 गावांत रिपाइंच्या शाखा आदी त्यांच्या नेतृत्वात झालेली कामे आणि आंदोलने लक्षणीय ठरली. त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळावे, अशी अपेक्षा समर्थकांना आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT