Who exactly is the Guardian Minister of Sindhudurg District : Nitesh Rane
Who exactly is the Guardian Minister of Sindhudurg District : Nitesh Rane 
मुख्य बातम्या मोबाईल

उदय सामंत येतात अन्‌ डायलॉग मारून निघून जातात : नीतेश राणे 

विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नेमका पालकमंत्री कोण? उदय सामंत की वैभव नाईक, हेच समजत नाही. यांच्या संघर्षामध्ये जिल्ह्याचे नुकसान होत आहे. पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसांसाठी जिल्ह्यात नाट्य कलावंताप्रमाणे येतात. डायलॉग मारतात, टाळ्या घेतात आणि निघून जातात. त्यांच्या प्रशासनाबरोबर होणाऱ्या बैठकांचे फलीत काय? कोरोनासाठी राखीव निधी ते खर्च करू शकलेले नाहीत,' अशी जहरी टीका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केली. 

आमदार राणे यांनी आज (ता. 13 ऑक्‍टोबर) जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात येत याबाबत माहिती दिली. या वेळी कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बंड्या नारकर, प्रीतेश गुरव, योगेश घाडी आदी उपस्थित होते. 

राणे म्हणाले, पालकमंत्री सामंत यांनी भात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या लोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी 25 कोटी रुपये जाहीर केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पावणेआठ कोटींच्या नुकसानीचे प्रस्ताव सरकारला पाठविले आहेत.

यातील एक रूपयाही अद्याप जिल्ह्याला मिळालेला नाही. त्यामुळे भात नुकसानीचे पंचनामे करून उपयोग होणार का? त्यांना मदत मिळणार का? क्‍यार वादळात झालेल्या नुकसानीचे 22 कोटी रुपये आल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात एकाही रुपयांची नुकसान भरपाई प्राप्त झाली नाही. एकीकडे कोरोनामुळे नागरिक आर्थिकदृष्ट्या त्रस्त असताना त्यात निसर्ग वादळाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या वाईट परिस्थिती आहे. 

ते म्हणाले, जिल्हा नियोजनसाठी या वर्षी केवळ 47 कोटी मिळाले आहेत. त्यातील 23 कोटी कोरोनासाठी खर्च करायचे आहेत; मात्र या 23 कोटीतील केवळ 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पंधरा कोटी रुपये ते खर्च करू शकलेले नाहीत. रुग्ण मरताहेत. व्हेंटीलेटरनंतर आणले गेले. त्यामुळे हा निधी शो पीस म्हणून ठेवला आहे का? नियोजन शून्य कारभार आहे.

बैठका घेतात आणि अधिकाऱ्यांना कामाला लावतात. उर्वरित 23 लाखांचे नियोजन काय? याचा आढावा द्या. सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात पहिल्या पाचात होता. कोरोनानंतर ही खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय करणार? पर्यटन व्यावसायिक, अन्य व्यावसायिक याच्या आर्थिक वृद्धीसाठी काय करणार? याची माहिती देत नाहीत.


उमेदसाठी 100 कोटी देणार कोठून?

उमेद अभियानावेळी महिलांसमोर भाषण करताना सामंत यानी कोणालाही कमी करणार नाही. तसा शासकीय आदेश झाला आहे, असे सांगितले. त्यावर राणे म्हणाले, सरकारी आदेश प्राप्त झाला का? सामंत हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी त्याचवेळी जीआर देणे गरजेचे होते. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. निसर्ग वादळाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. अशा स्थितीत उमेदसाठी 100 कोटी देणार कोठून? केवळ जनतेसमोर भाषणबाजी करण्यात आली.

सामंतांना सांस्कृतिक मंत्रिपद द्या 

मंत्री सामंत यांची नाट्यक्षेत्राशी जवळीक आहे. त्याप्रमाणे ते जिल्ह्यात नाटक कंपनी किंवा एखाद्या कलाकाराप्रमाणे जिल्ह्यात येतात. डायलॉग मारतात. टाळ्या मिळवितात आणि निघून जातात. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक मंत्री करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, अशी टिका राणे यांनी केली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT