Mushriff-Patil_Ghatge
Mushriff-Patil_Ghatge 
मुख्य बातम्या मोबाईल

सोमय्यांना माहिती कोणी दिली? मुश्रीफांनी भाजपच्या या दोन नेत्यांची नावे घेतली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कामगारमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले असून सोमय्या यांनी दिशाभूल करत आरोप केल्यामुळे त्यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. (Hasan Mushriff asks apology from Kirit Somaiya otherwise file Rs 100 crore defamation case) 

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचे नाव देखील वाचता येत नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून माझी हवी तिथं खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देखील मुश्रीफ यांनी दिले.

“राजकारणात, समाजकारणात आपली प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष घालवावी लागतात, कष्ट करावे लागतात. पण कुणीही यावं आणि डाग लावावा ही परिस्थिती आली आहे. माझ्यावर आधी असे आरोप झाले, तेव्हा मी मानहानीचे दावे ठोकले आहेत. आता हा सातवा दावा ठोकणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. मी १७ वर्षे या राज्यात मंत्री आहे. माझ्यावर एक साधा आरोप झाला नाही, चौकशी झाली नाही, कुणी चर्चा केली नाही. भाजपाच्या सत्ताकाळात चिक्की घोटाळा, मुंबईचा गृहनिर्माण घोटाळा असे घोटाळे झाले. माझ्यावर तर कधीच आरोप झाले नाहीत”, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

सोमय्या यांना आमच्या कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी असे आरोप केले आहेत. त्यांनी स्वतः कोल्हापुरात येऊन माहिती घ्यायला हवी हती. कोल्हापुराच्या राजकारणात भाजपला स्थान मिळाले नाही. अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारावा लागला. पुढील पाच वर्षे तरी कोल्हापुरातील जनता भाजपला स्वीकारणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटालांना पुण्याला जावे लागले. त्यामुळे चिडून माझ्यावर आरोप केले आहेत, असे प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी दिले. 

किरीट सोमय्या हे मुक्त विद्यापीठ आहेत. ते कधीही काहीही बोलून जातात. चंद्रकांत दादा मंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती हे किरीट सोमय्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मुळातच ते बिचारे आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळणे, निषेध करणे असे काम करू नये. त्यांना काहीच माहिती नसताना ते उगाचच बोलत असतात, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्या नेमके काय म्हणाले?

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे. बाप टे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत, असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT