Who will Shiv Sena give a chance to as Ratnagiri Zilla Parishad president?
Who will Shiv Sena give a chance to as Ratnagiri Zilla Parishad president?  
मुख्य बातम्या मोबाईल

रामदास कदम, भास्कर जाधव, विनायक राऊत यांची प्रतिष्ठा पणाला 

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेत विक्रांत कदम, बाळशेठ जाधव, अण्णा कदम यांच्यासह शिवसेनेतील ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्यात चुरस आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेत निष्ठावंत असलेल्या बने यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागणार की नाही, याकडेच लक्ष लागले आहे. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष लागलेले आहे. अध्यक्षपदी खुल्या गटातील सदस्यांनाही संधी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. ह्या पंचवार्षिकमधी हे शेवटचे वर्ष असून भविष्यात खुल्या गटातील सदस्यांना संधी मिळणे शक्‍य नाही. 

शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांना संधी मिळावी, यासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. मागीलवेळी नवीन चेहरा देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून रोहन बने यांचे नाव पुढे केले गेले. पाच वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या उदय बने यांना शेवटच्या टर्ममधील संधी मिळेल, अशी अटकळ होती; परंतु चिपळूणमधील बाळशेठ जाधव यांच्यासह पुतण्या आणि आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत यांचे नाव पुढे आल्यामुळे चुरस वाढली आहे. 

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण ऊर्फ अण्णा कदम यांचेही नाव चर्चेत आहे. राजकीय परिस्थितीबरोबरच कोरोनातील परिस्थितीत जिल्हा परिषदेचा कारभारला दिशा देण्याच्या उद्देशाने अनुभवाची गरज भासणार आहे. रोहन बने यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा बनून कामकाज चालवले. सव्वा वर्षानंतर निवडणुका असल्यामुळे त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा कारभार चालवण्यासाठी उदय बने यांचा विचार होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

निष्ठावंतांच्या सन्मानांचा संदेश 

सध्याच्या परिस्थितीत बने यांना पद देऊन त्यांचा शिवसेना निष्ठावंतांचा सन्मान करते, हा संदेश देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोकणातील सेनेच्या प्राबल्याला धक्‍का देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी देत कोकणातील शिवसैनिकांना वेगळा संदेश देणे आवश्‍यक असल्याचे बोलले जात आहे. 

मातोश्री दखल घेणार का? 

उदय बने यांच्यामागे गॉडफादर नसला तरीही शिवसेनेतील त्यांच्या निष्ठेची दखल मातोश्रीवरून घेतली जाऊ शकते. बने यांनी खासदार राऊत, मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मातोश्रीवरून कुणाच्या नावाला पसंती दिली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT