Will Samadhan Avtade get BJP candidature from Pandharpur constituency?
Will Samadhan Avtade get BJP candidature from Pandharpur constituency? 
मुख्य बातम्या मोबाईल

पंढरपूरमधून भाजपची उमेदवारी समाधान आवताडेंना पक्की?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या अपक्षांकडून उमेदवार अर्ज दाखल होत आहे. मात्र, राजकीय पक्षांकडून अजून उमेदवारी जाहीर न झाल्याने अधिकृत उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून समाधान आवताडे यांची उमेदवारी निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भालके कुटुंबाबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षकांसमोर भगीरथ भालके यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर दौऱ्यात राष्ट्रवादी उमेदवार हा तुमच्या मनातील असल्याचे सांगत ती भालके कुटुंबातच असणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, उमेदवारी भगिरथ भालके यांना मिळणार की जयश्री भालके यांच्या नावाची घोषणा होणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांची मात्र भगिरथ भालके यांच्या नावाला पसंती आहे. 

दुसऱ्या बाजूला गत निवडणुकीत भालके यांच्या बरोबरीने सुधाकरपंत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हेही रिंगणात होते. यंदा मात्र भाजपने ही जागा जिंकण्याचा इरादा स्पष्ट करत आमदार प्रशांत परिचारक व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यासमवेत मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत आमदार परिचारक यांनी आवताडे यांच्या नावाला संमती दिल्याचे समजते. याबाबत परिचारक गटातील मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनीदेखील दोघे लढून तिसऱ्याचा फायदा करण्यापेक्षा दोघे एकत्र येऊन लढवावे, असा सूर आळविला. 

सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे परिचारक गट कोणत्याही सार्वजनिक कार्यात सहभागी झालेला नाही. पण, सध्याच्या पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराने घेतली आहे. त्यातूनच भाजपकडून दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. 

दरम्यान, आवताडे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून आवताडे यांच्या फोटोच्या बरोबरीने भाजपच्या कमळ चिन्हाचा लोगो सोशल मीडियावर व्हायरल करून उमेदवारी पक्की झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे अद्याप जाहीर नसला तरी भाजपची उमेदवारी ही अवताडे यांना निश्‍चित समजून समर्थकांनीदेखील आपल्या राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT