कडूस (जि. पुणे) : खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समितीच्या सभागृहात 30 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
खेड पंचायत समितीत 14 पैकी 8 सदस्य शिवसेनेचे आहेत. मात्र, सभापतिपदासाठी तीनजण इच्छुक आहेत. त्यामळे सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खेड पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे.
पंचवार्षिक निवडणुकीच्या पहिल्या अडीच वर्षात सुभद्रा शिंदे या सभापती होत्या. पंचवार्षिक दुसऱ्या सत्रातील अडीच वर्षांकरिता सभापतिपद नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव झाले. डिसेंबर महिन्यात शिवसेनेचे अंकुश राक्षे सभापती झाले होते. सदस्यांमध्ये आपापसांत ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला.
राजीनामा मंजूर झाल्यानंतर या रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. पंचायत समितीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या विषयपत्रिका सर्व सदस्यांना पोच झाल्या आहेत.
खेड पंचायत समितीत 14 पैकी 8 सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यांच्यात सभापतिपदासाठी सुनीता सांडभोर व वैशाली जाधव या प्रबळ इच्छुक आहेत. मात्र, माजी उपसभापती भगवान पोखरकर यांना शब्द दिलेला आहे. त्याप्रमाणे त्यांना संधी मिळेल, असे मावळते सभापती राक्षे यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्राबल्य असले, तरी सभापतिपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच पंचायत समितीच्या नूतन वास्तू बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते हे या निवडणुकीत काय भूमिका घेणार, हे सुद्धा महत्त्वाचे असल्याने निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.