21EXams.jpg
21EXams.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दहावी- बारावीच्या परीक्षा पुढे ढकला : नाना पटोले

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो  विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत  दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवून विद्यार्थ्यांचा या महामारीच्या धोक्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला. दहावी बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची असते. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु मागील दोन महिन्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या वेगाने वाढलेले आहे. 

राज्यातील सरकारी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीच्या संघर्षात लढा देत आहे. राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणे संयुक्तीत ठरणार नाही. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता परीक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, परिक्षेसाठी लागणारा इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह अनेक घटक यावेळी संपर्कात येतात. यातून एख्याद्याला कोरोनाची लागण झाली तर त्यातून अनेकांना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ११ एप्रिलची परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली आहे. पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या त्यानंतर ९ वी व ११ वीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि पालक तसेच बहुसंख्य विद्यार्थ्यांकडूनही  बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे अभ्यास अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. याबाबात सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करावा ते सर्वांच्याच हिताचे होईल असे पटोले म्हणाले. 
Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT