मुख्य बातम्या मोबाईल

येडीयुरप्पांच्या कट्टर समर्थकाला हवी आहे सोलापूर लोकसभेची उमेदवारी!

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपत उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कर्नाटकमध्ये कर्मभूमी आणि मूळ अक्कलकोटचे रहिवासी असलेल्या राजेश मुगळे यांच्या घोषणेमुळे भाजपच्या इच्छुकांत आणखी एकाची भर पडली आहे, तर कॉंग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांचे एकमेव नाव आघाडीवर आहे. कॉंग्रेसकडून श्री. शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे यांच्याच नावाचा आग्रह मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत धरण्यात आला. मात्र, कॉंग्रेसमधील नाराज गटाने माजी महापौर संजय हेमगड्डी यांचे नाव पुढे केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, श्री. हेमगड्डी यांनी स्वतः श्री. शिंदे यांचे नाव सुचविल्याने त्यांचे नाव पुढे करणाऱ्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. शिंदे इच्छुक असतील तर इतरांच्या नावांचा विचारही होणार नाही, हे स्वष्ट आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच नाही. 

भाजपत इच्छुकांची संख्या सातत्याने वाढतच आहे. विद्यमान खासदार ऍड. शरद बनसोडे यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे, डॉ. जयसिद्धेश्‍वर , माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि आता मुगळे यांनीही लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. मुगळे यांची जन्मभूमी अक्कलकोट असली तरी, कर्मभूमी कर्नाटकात आहे. तेथे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा दबदबा आहे. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा सोलापुरात मित्रांचा गोतावळाही भरपूर आहे. शहरातील विविध संघटनांच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात मुगळे यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे श्री. ढोबळे यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सोलापुरातील एका मंत्र्यांची अडचण झाली आहे. कॉंग्रेस व भाजप व्यतिरिक्त यंदा आकर्षण असणार आहे ते वंचित बहुजन आघाडीचे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरातूनच उभारण्यासाठी एमआयएमकडून आग्रह धरला जात आहे. भाजपबरोबर आघाडी असली तरी रिपब्लिकन पक्षातर्फे सोलापूरची निवडणूक लढविण्याची घोषणा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांनी केली आहे. आघाडीवर असलेले नेते रिंगणात उतरले तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT