Young man arrested for posting offensive post against Nana Patole :
Young man arrested for posting offensive post against Nana Patole : 
मुख्य बातम्या मोबाईल

नाना पटोले यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट तरुणाला पडली महागात 

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली आहे. कृणाल मोहनराव दहिवाले (वय 34 रा. नाईक रोड, महाल, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

कृणाल दहिवाले याने 27 फेब्रुवारी रोजी आमदार नाना पटोले यांच्याविरुद्ध फेसबुक व अन्य सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कॉंग्रेस कार्यकर्ते आकाश पितांबर तायवाडे (वय 31 रा. गोपालनगर, नागपूर) यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

पोलिस उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, पोलिस निरीक्षक व्ही. बी. जाधव, उपनिरीक्षक व्ही. बी. पवार, हवालदार चंद्रमणी सोमकुवर, मनोज निमजे, मिलिंदकुमार मेश्राम, विशाल घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेऊन कृणाल दहिवाले याला अटक केली. 

पोलिसांनी दहिवाले याला सोमवारी (ता. 8 मार्च) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. कृणाल हा सौंदर्य प्रसाधानाच्या एजन्सीत प्रतिनिधी आहे. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा : नाना पटोलेंसाठी कॉंग्रेसचा कोणता मंत्री देणार बलिदान ? 

नागपूर : नाना पटोले विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले. त्यानंतर त्या पदाचा तिढा अद्याप सुटला नाही. पुणे जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असली तरी, नाना पटोलेंना मंत्रिपद हवे आहे. राजीनामा देताना त्यांना तशी "कमिटमेंट' दिल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. पण नाना पटोलेंसाठी राज्यातील कोणता मंत्री बलिदान देणार किंवा श्रेष्ठी कुणाला बळीचा बकरा बनवणार, ही चर्चा जोरात सुरू आहे. 

प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद असू नये, त्याने पूर्णवेळ पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करावे, असे मानणारा एक वर्ग पक्षात आहे. तर प्रदेशाध्यक्षाला कार्यकर्त्यांचे संघटन करताना राज्यभर फिरावे लागते. मेळावे, बैठका घ्याव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्‍यकता असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षाकडे मंत्रिपद आणि तेही "ऊर्जावान' असावे, असे मानणारा दुसरा वर्ग आहे. नानांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांनाही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. पण त्यांना मंत्रिपद द्यायचे, तर बलिदान कोण देणार किंवा पक्षश्रेष्ठी कुणाचा बळी देणार, यावर पक्षात विविध चर्चांनी जोर पकडला आहे. कुणीही असो पण बकरा (की बकरी) विदर्भातलाच असेही अशीही माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT