Youths Travelling From Chakan to Assam State
Youths Travelling From Chakan to Assam State 
मुख्य बातम्या मोबाईल

चाकणहून थेट आसामला? रेल्वे, बस नही, तो सायकल ही सही.... 

सरकारनामा ब्युरो

चाकण ः चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील तरुण कामगार लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने सायकलवरुन आपल्या मूळगावी आसामला निघाले आहेत. रेल्वे, बसची सोय होत नसल्याने त्यांनी चक्क वीस नव्या सायकली विकत घेऊन सायकलने प्रवास करत पंधरा दिवसांत पोचण्याचा निश्‍चय केला आहे. सायकलने दीड हजारांवरील किलोमीटर अंतराचा मोठ्या प्रवासाचा आनंदही आहे आणि दुःखही आहे, असे ते या वेळी म्हणाले. 

ज्या ठिकाणी रेल्वे बंद आहेत. बसने प्रवास करता येत नाही, त्या ठिकाणी तरुण कामगार, मजूर यांनी सायकलने जाण्याचा मार्ग निवडला आहे. उत्तर प्रदेश, आसाम, पश्‍चिम बंगाल या ठिकाणी तरुण कामगार सायकलने जात आहेत. चाकण परिसरातून सुमारे एक हजार नव्या सायकली विकत घेऊन परप्रांतीय गावी जात आहेत. याबाबत डेबू ज्वाली याने सांगितले की, रेल्वे आणि बस सुरू नाहीत, त्यामुळे तरुण कामगारांनी गावी जाण्यासाठी साडेचार हजार रुपयांना एक सायकल विकत घेतली आहे. सरकार आम्हाला काही मदत करत नाही. येथे उपाशी राहण्यापेक्षा गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस या प्रवासात जातील. वीस जणांच्या समूहाने आम्ही निघालो आहे. इतरही बरेच जण सायकलने जात आहेत. 

महाराष्ट्र पाठविण्यास तयार; मात्र गृहराज्ये कामगारांना स्वीकारेनात 

चाकण ः औद्योगिक वसाहतीत काम करणारे परप्रांतीय कामगार लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने आपल्या मूळगावी निघाले आहेत. त्यांचे ऑनलाइन अर्जही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. त्यांच्या नावाच्या याद्याही तयार आहेत. महाराष्ट्र सरकार त्यांना त्यांच्या राज्यात रेल्वेने पाठविण्यास तयार आहे. पण त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री या कामगारांना घेण्यास तयार नाहीत. अशी परिस्थिती आहे. 

दरम्यान, सध्या काही कंपन्या सुरू झाल्या आहेत, या कामगारांनी सध्या आहे, तेथेच थांबून कंपन्यांत काम करावे, त्यांची सुरक्षितता सरकार करेल, असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. 

खेड तालुक्‍यातील चाकण औद्योगिक वसाहतीत परराज्यातील पन्नास हजारांवर कामगार काम करत आहेत. मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, ओरिसा, कर्नाटक व इतर राज्यांतील कामगार रेल्वेने, खासगी बसने, तसेच पायी गावाकडे निघाले आहेत. अजूनही काही पायी निघत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यात जाणाऱ्या कामगारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यांच्या याद्याही तयार आहेत, रेल्वे तयार आहे, पण तेथील मुख्यमंत्री त्यांना त्यांच्या राज्यात घेण्यास तयार नाहीत. महाराष्ट्र सरकारला ते प्रतिसादही देत नाहीत, त्यामुळे त्यांचे काय करायचे, असा प्रश्न राज्य सरकारला पडला आहे. 

याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, परप्रांतीय कामगार भीतीमुळे त्यांच्या राज्यात जात आहेत. त्यांच्या राज्यात त्यांना पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी परप्रांतीय कामगारांच्या पाठवणीबाबत चर्चा केली आहे. पण त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही. परप्रांतीय कामगार गावी गेल्याने कंपन्या सुरू होऊनही त्यांना कामगार मिळत नाही. त्यामुळे कामगारांनी त्यांच्या राज्यात जाऊ नये. येथेच थांबून कंपन्यांत काम करावे. सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT