Uddhav Thakckrey
Uddhav Thakckrey Sarkarnama
विशेष

शिंदे गटाचे 22 आमदार शपथविधीला अनुपस्थित... `मातोश्री`चे आहे लक्ष!

ज्ञानेश सावंत

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार काल झाल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी पुढे येऊ लागल्या आहेत.अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनी कसे मंत्रीपद मिळवले, मुख्यमंत्र्याचे पुत्रे श्रीकांत शिंदे यांचा कोणासाठी आग्रह होता, ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही अशा बच्चू कडू यांनी कोणत्या भाषेत इशारा दिला, यावर अनेक राजकीय चर्चा घडत आहेत.

त्यातील काही चर्चांचा कानोस घेतला तर शिंदे गटाच्या एका आमदाराने या विस्ताराला आमच्याच गटाचे 22 आमदार अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले. शपथविधीच्या दिवशी हे आमदार नंदनवन बंगल्यावर सकाळी उपस्थित होते. मात्र त्यांनी समारंभाकडे पाठ फिरवली. ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते तेच पुन्हा लाभार्थी झाले आहेत. या मंत्र्यांना गुवाहटीकडे जातानाच बरीच आश्वासने दिली होती. गुवाहटी पोहोचताच ती पूर्ण पण झाली. त्यातील काहींना आपण वगळू, असे शिंदेंनी आमदारांशी बोलताना सांगितले होते. मात्र हेच पुन्हा सारा लाभ मिळवून मंत्री झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्थता आहे. तसेच अपक्ष आमदारही संतापले आहेत. त्यातूनच इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार अनुपस्थित राहिले, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असेही हा आमदार म्हणाला.

या आमदाराच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये आमच्याविरोधात काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार आतापासूनच तयारी करत होता. त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते भरीव मदत करत होते. हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही बंडाला तयार झालो. वैयक्तिक उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग नव्हता. मात्र आदित्य ठाकरे यांनी गद्दार आणि `मातोश्री`चे दरवाजे बंद असे शब्द उच्चारल्यानंतर वातावरण चिघळले. ठाकरेंना दगा दिल्याचे आमच्याही मनात सलते आहे. पण त्याला पर्याय नव्हता. पण गोष्टी पुढे गेल्या आहेत, असे हा आमदार म्हणाला.

शिंदे गटाचे आमदार अनुपस्थित असल्याचे शिवसेनेतील काही नेत्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्यानंतर तिकडूनही मग काही समजूत घालणारे संदेश पाठविल्याची माहिती रात्री उशिरा या आमदाराने दिली. त्यामुळे सध्यातरी `मातोश्री`चे आहे लक्ष असेच म्हणता येईल. यातून पुढे संवाद सुरू राहणार की नाही, हे मात्र लगेच सांगता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT