आपल्या अमोघ वक्तृत्वासाठी दिवंगत प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आजही ओळखले जातात. एकेकाळी फक्त दोन खासदारांचा पक्ष असलेल्या भाजपला देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सोबतच अटलबिहारी वाजपेयींपासून ते आडवाणींपर्यंत आणि संघामध्ये सरसंघचालकापासून ते मराठवाड्यातील एखाद्या साध्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते.
असे म्हंटले जायचे की अटलजी (Atal bihari vajpayee) नियमांचे पक्के होते, पण कधी कधी तडजोड करुन मधला मार्ग काढायचे, तर आडवाणीही (Lal krishna Advani) कडक स्वभावाचे आणि नियमांच्या बाबतीत आग्रही होते. ते कोणतीही तडजोड करत नसत. पण या दोघांच्या मधला मार्ग प्रमोद महाजन काढायचे. त्यामुळे ते वाजपेयी-आडवाणी जोडीचे हनुमान म्हंटले जायचे.
पण तत्कालिन पंतप्रधान वाजपेयींनी एकदा याच विश्वासू महाजनांना मंत्रीमंडळातून नारळ दिला होता. मात्र त्यानंतर महाजनांनी केलेल्या एका वक्ताव्यामुळे पंतप्रधानांपासून सगळ्यांनाच धडकी भरली होती.
प्रमोद महाजन २००३ मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारणमंत्री होते. या खात्याचे मंत्री म्हणून महाजनांवर त्यावेळी रिलायन्स इन्फोकॉमला झुकत माप दिल्याची टीका होत होती. त्यात योगायोग म्हणजे त्याच्या काही दिवस आधीच धीरुभाई अंबानींच्या जयंतीदिवशी त्यांनी धीरुभाईंना भारतरत्न देण्याची खुलेआम मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या या आरोपांना जास्तच हवा मिळाली. त्यावेळी महाजन आणि तत्कालीन भाजप नेते आणि मंत्री अरुण शौरी (Arun shourie) यांचेही संबंध फारसे चांगले नव्हते. याच मुद्द्यावरुन शौरींनी यांनीही महाजनांवर टीका करायला सुरुवात केली.
या दोन गोष्टींमुळे जे प्रमोद महाजन सर्वांचे लाडके बनले होते पक्षाला डोईजड वाटू लागले होते. परिणामी वाजपेयींना त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रमोद महाजन यांना मंत्रिमंडळ विस्तारात नारळ द्यावा लागला. आणखी एक योगायोग म्हणजे प्रमोद महाजनांविरुद्ध आघाडी उघडणारे अरुण शौरी हेच माहिती व प्रसारण विभागाचे मंत्री झाले होते. त्यानंतर महाजन यांना पक्ष संघटनेत पाठवण्यात आले. मात्र ते डगमगले नाहीत. पत्रकार परिषदेत या मंत्रीमंडळ बदलावर त्यांना विचारले असता त्यांनी आपले मंत्रिपद गेले हि एकप्रकारची बढतीच असल्याचे सांगितले. सोबतच म्हणाले,
महाजनांच्या या वक्तव्यात काहीशी 'सत्तेचा रिमोट कंट्रोल' या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) वक्तव्याची लकब जाणवत होती. त्यामुळे आता महाजन हे वाजपेयी सरकारचा रिमोट कंट्रोल होवून सरकार चालवणार का? असा सवाल विचारला जावू लागला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधानांपासून भाजपच्या सगळ्यांच नेत्यांना धडकी भरली होती. पण त्यानंतरही वाजपेयींचा आपल्या महाजनांवरचा विश्वास कमी झाला नव्हता. त्यावेळी महाजनांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन ठिकाणी भाजपला विजय मिळाला. पुढे महाजन यांच्या आग्रहाखातरच मुदतपूर्व लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यांनीच शायनिंग इंडियाचे कॅम्पेनिंग डिझाईन केले. आता याला जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, आणि वाजपेयींना सत्तेतून पायउतार व्हावे लागले हा भाग वेगळा पण महाजन यांचा आत्मविश्वास तसुभरही कमी झाला नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.