मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात (Cabinet expansion) मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार (MLA) नाराज झाले आहेत. त्यातील काहींनी उघडपणे आपली नाराजी दर्शविली आहे. आता या नाराज आमदारांच्या हालचाली पुन्हा वाढल्या असून त्यांच्या आपापसांत बैठका होत आहेत. मात्र, सतर्क शिंदे-फडणवीसांनी हा धोका ओळखून नाराज आमदारांच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून वॉच ठेवला जात आहे. (Again secret meetings of disgruntled MLAs; But watch of intelligence agencies)
या नाराज आमदारांवर गुप्तचर विभागाकडून दिवस-रात्र पाळत ठेवण्यात येत आहे. हे नाराज आमदार दगा-फटका करण्याची भीती सत्ताधारी मंडळींना आहे, त्यातूनच सरकारने हे पाऊल उचलेले आहे. हे आमदार कुठे जातात, कुणाला भेटतात, कितीवेळ आणि किता वेळा भेटतात, याची नोंदी ठेवल्या जात आहेत. या आमदारांच्या बैठका कुठे होत आहेत, हेही पाहिले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला खिंडार पाडले होते. हे सर्व आमदार आपल्या मंत्रीपद किंवा काही तरी आपल्या पदरात पडेल, या आशेने बंडात सामील झाले आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिंदे गटाच्या केवळ ९ जणांनाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चाळीस आमदारांमधील अनेकजण नाराज झाले आहेत. त्याची झलक मंत्रिमंडळ विस्तारानंतर अख्ख्या राज्याला पहायला मिळाली आहे.
पहिल्या विस्तारात अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नावे नव्हती. ही गोष्ट समजल्यानंतर या दोघांनी एकनाथ शिंदे यांच्यापुढेच आक्रमक पावित्रा घेतला. त्यांच्या आक्रमकतेपुढे अखेर शिंदे यांनी नमते घेत दोघांना पहिल्याच विस्तारात सामावून घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, मंत्रिपदाचे दावेदार आमदार संजय शिरसाट यांचे नाव अखेरच्या क्षणी कापले गेले, त्यामुळे शिरसाट हे भलतेच संतापले होते. त्यांनी कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा डीपीही आपल्या फेसबुक पेजवर ठेवला होता. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उदय सामंत आणि इतरांनी शिरसाट यांची समजूत घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.
आमदार भरत गोगावले हेही मंत्रिमद न मिळाल्याने नाराज असल्याचे सांगितले जात आहे. बच्चू कडू यांनी तर मंत्रिपद हा आमचा हक्क आहे, असे सांगून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुःखी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण हेच बंडखोर आमदार मंत्रिपद न मिळाल्याने आपापसात बैठका घेत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, राजकीय डावपेचात माहीर असलेले फडणवीस यांनी अगोदरपासूनच या नाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर विभागाला कामाला लावले आहे. या सर्व आमदारांवर राज्य सरकारकडून नजर ठेवण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.