Ajit Pawar meets Koshyari
Ajit Pawar meets Koshyari sarkarnama
विशेष

अजितदादा राज्यपालांना भेटायला गेेले पण त्यांनी टेबलक्लाॅथ का पकडलाय?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण भाव खाऊन गेले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अजितदादांनी पंतप्रधानांसमोरच जाहीर भाषणात नाराजी व्यक्त केली. मोठ्या व्यक्तींनी बोलताना भान राखावे, असे सांगण्यास त्यांनी कमी केले नाही. पण राज्यपालांबद्दल बोलून चोवीस तास होताच अजित पवार आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण हे राज्यपालांना सात मार्च रोजी राजभवनावर भेटायला गेेले.

या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र या भेटीचे कारण म्हणजे विधानसभा अध्यक्षासाठी ९ मार्च रोजी होणारी बहुचर्चित निवडणूक हेच असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. ही निवडणूक पुढे जाण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निवडणुकीला मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पुणे येथे झालेल्या मेट्रोच्या उद्‌घाटन समारंभात अजित पवारांनी राज्यपालांचा उल्लेख न करता पदावरील मोठया व्यक्तींनी अयोग्य वक्तव्ये करु नयेत, असे नमूद केले होते. त्याचीही काही पार्श्वभूमी या भेटीमागे होती का, अशी कुजबूजही होती.

या भेटीचे छायाचित्र माध्यमांना देण्यात आले. त्यावेळी राज्यपालांसमोर अजितदादा आणि अशोक चव्हाण बसल्याचे दिसते. यात एका छायाचित्रात अजितदादांनी समोरील टिपाॅयवरील कापड हाताने नीट, व्यवस्थित करत असल्याचे दिसत आहे. अजितदादांना त्या कपड्यावर पडलेली घडी खटकली असल्यान ते नीट करत असावेत किंवा राज्यपाल बोलत असताना ते अजितदादा या कापडाकडे लक्ष देत ऐकत असण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीला नऊ तारखेला नवा अध्यक्ष निवडायचा आहे, असे सांगितले जात होते. विधानसभा नियमांनुसार दोन दिवस म्हणजे ४८ तास आधी निवडणुकीची नोटीस द्यावी लागते, अशी नोटीस आज जारी केली गेली नाही. विधानसभा नियमसमितीने अध्यक्षाची निवडणूक गुप्त मतदानाने न करता आवाजी मतदानाने करावी असा बदल केला आहे. हा बदल योग्य नाही. तो करताना नियमानुसार प्रक्रिया केली गेली नाही, असा भाजपचा आक्षेप आहे. नव्या नियमानुसार मुख्यमंत्री राज्यपालांना अध्यक्षनिवडीची तारीख सुचविणार आहेत. हा बदल अयोग्य असून या तरतुदीमुळे अध्यक्षाची निवड ही मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत येईल, हे न्यायसंगत नाही. दबाव टाकणारे असल्याची भूमिका घेत जनक व्यास आणि भाजपनेते गिरीश महाजन यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. उद्या (ता. ८) या याचिकांवर सुनावणी होईल. दरम्यानच्या काळात ही प्रक्रिया सुरु करणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मविआचे मंत्री दोन दिवसांपूर्वी भेटायला गेले होते तेंव्हा दोन महिन्यांपूर्वी पाठवलेल्या पत्राबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तुम्हाला विचारायची गरज तरी काय असा प्रश्न त्यात केला गेला होता, असे समजते. त्याबद्दल राज्यपाल नाराज आहेत.


मुख्यमंत्रीच राज्यपालांना तारीख कळवणार
राज्यपालांनी परवानगी दिली नाही तरी अध्यक्षाची निवडणूक घ्यावी असा प्रस्तावही काही आक्रमक नेत्यांनी समोर ठेवला आहे. नव्या बदलानुसार तारीख राज्यपालांनी ठरवायची नसून ती मुख्यमंत्र्यांनी त्यांना कळवायची असे ठरले आहे. त्यामुळे निवडणूक घेतो आहोत असे कळवून अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया पूर्ण करावी असा मतप्रवाह मांडला जातो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT