Girish Mahajan -Ajit Pawar-Sudhir Mungantiwar
Girish Mahajan -Ajit Pawar-Sudhir Mungantiwar Sarkarnama
विशेष

गिरीश महाजन मुख्यमंत्री कधी होणार हे सांगताना अजितदादांचा मुनगंटीवारांना चिमटा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चिमटे काढले. ते काढत असताना उत्तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कधी संधी मिळणार, हेही हास्याचे फवारे उडवत अजित पवार यांनी सांगून टाकले. त्यांच्या या भाषणावर सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. (Ajit Pawar said, when will Girish Mahajan become the Chief Minister)

महाराष्ट्राची निर्मिती होऊन आज ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ६२ वर्षांपैकी मराठवाडा आणि विदर्भातील नेत्यांनी ३२ वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. कोकण-मुंबईकडे १० वर्षे, तर ३० वर्षे पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली आहे. दुर्दैवाने उत्तर महाराष्ट्राला मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. उत्तर महाराष्ट्रातील एकाला (ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे) संधी मिळणार होती. मात्र त्यांची ती संधी गेली. दुसऱ्या नेत्याला (गिरीश महाजन) तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. पण, त्यांच्यापुढील व्यक्ती (विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस) दिल्लीच्या राजकारणात जाईल, तेव्हाच त्यांना (महाजन) संधी मिळणार आहे. त्यानंतरच त्यांना पुढे बसायची संधी मिळणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून कसे बोलतात. कसे वागतात, हे सर्व महाराष्ट्राला कळेल. त्यानंतरच उत्तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना (गिरीश महाजन) संधी मिळेल. पण, ही संधी मिळत असताना फडणवीसांच्या डाव्या बाजूला बसलेले (सुधीर मुनगंटीवार) यांना जरा रागच येईल, अशा शब्दांत अजितदादांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले. हे ऐकून संपूर्ण सभागृहात हस्याचे फवारे उडाले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आम्ही सत्तेवर आलो की आम्ही विदर्भविरोधी आहेत, असे चित्र उभे केले जाते. मात्र, आम्ही तसा भेदभाव कधीही केलेला नाही. मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडबाबत भाष्य केले गेले. विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्यपालाच्या निर्देशानुसार निधी देण्यात आलेला आहे. आम्ही जोपर्यंत राज्यात सत्तेवर राहू; तोपर्यत विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही. सुमारे २१ हजार कोटी रुपये मराठवाड्याला, तर विदर्भात २९ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला जरा झुकते माप देण्यात आले आहे.

...म्हणून राष्ट्रवादीकडून विदर्भाला महत्वाची खाती मिळाली नसतील

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला महत्वाची खाती का देत नाही, या सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, विदर्भाला महत्वाची खाती देताना आम्हाला काही अडचणी आहेत. कारण, विदर्भातून आम्हाला पुरेसे समर्थन मिळालेले नाही. त्यामुळे आमचे लोकप्रतिनिधीही कमी निवडून आलेले आहेत, त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाकडून विदर्भात खाती मिळाली नसतील. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक पत्र दिले आहे. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव व सही नाही. त्यात सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, श्वेता महाले, आशिष शेलार यांच्याही सह्या आहेत. त्यात दुबार सह्या आहेत, असेही त्यांनी उघड केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT