Rohit Pawar- Vijaysinh Mohite Patil Sarkarnama
विशेष

Rohit Pawar On Mohite Patil : अकलूजची पूर्वीची धमक आता कुठेतरी मावळल्यासारखी वाटते : रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचले

जिल्ह्याची सर्व सूत्रे ही पूर्वी ‘शिवरत्न’ बंगल्यावरून हलायची.

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : बारामतीहून हेलिकॉप्टरने येत असताना पवारसाहेब सांगत होते, हे गाव आहे, ते गाव आहे. हा कारखाना आहे, अकलूज आहे. पूर्वी खरं तर अकलूजला एक चमक होती, धमक होती. पण, आता हेलिकॉप्टरमधूनसुद्धा ती धमक कुठेतरी मावळल्यासारखी मला वाटली, अशा शब्दांत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोहिते पाटील यांना नाव न घेता चिमटा काढला. (Akluj's former luster seems to be gone now : Rohit Pawar)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्याच्या भूमिपूजनासाठी पंढरपुरात आले होते. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार हेही होते. प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर आमदार पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, रवींद्र धंगेकर, कैलास पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, बळीराम साठे, उमेश पाटील आदी उपस्थित होते

विजयसिंह मोहिते पाटील (Mohite Patil) हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर प्रथम रणजितसिंह आणि त्यानंतर विजयदादा यांच्यासह संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय भाजपत गेले. राष्ट्रवादीत असताना सोलापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी ही विजयदादांवर होती. जिल्ह्याची सर्व सूत्रे ही पूर्वी ‘शिवरत्न’ बंगल्यावरून हलायची. तोच धागा पकडून रोहित पवार यांनी पूर्वी अकलूजला एक चमक आणि धमक होती, असा उल्लेख केला.

भाजप प्रवेशानंतर मोहिते पाटील यांच्या पदरात रणजितसिंह यांची आमदारकी सोडता मोठं काही पडलेलं नाही. माढा मतदारसंघाचे खासदार आणि माळशिरसचे आमदार यांच्याशी त्यांचे किती पटतं, हे जिल्ह्यात कायम चर्चिले जाते. पूर्वी काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर राष्ट्रवादीत असताना सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा बॅंकेचा अध्यक्षपासून अगदी नगराध्यक्षपदाचा उमेदवारही शिवरत्नवरून ठरायचा. सोलापूर शहराचा महापौर ठरविण्यातही विजयदादांची भूमिका मोठी असायची. पण, भाजपत गेल्यापासून ते काहीसे अडगळीत पडल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळेच रोहित पवार यांनी अकलूजची पूर्वीची धमक आता कुठेतरी मावळल्यासाखी वाटते, असे म्हटले आहे.

सोलापूर राष्ट्रवादीत बदलाची गरज : रोहित पवार

दरम्यान, रोहित पवारांनी सोलापूर राष्ट्रवादीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सोलापूर राष्ट्रवादीची भाकरी फिरविण्याची वेळ खऱ्या अर्थाने आता आली आहे. इथले काही पदाधिकारी आहेत, जे कडक कपडे घालतात. पुढं पुढं करतात आणि मग मीच सर्वोच्च आहे, असं दाखविण्याचा प्रयत्न करतात. पण इथली माणसं आपली आहेत, त्यांच्यासाठी भाकरी फिरविण्याची वेळ आज आल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आपले जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अनेक वर्षांपासून कष्ट करत आहेत, पक्षासाठी परिश्रम घेत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या पार्टीला ताकद दिली आहे. अतिशय प्रामाणिकपणे ते आपले काम करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT