Thane Lok Sabha News Sarkarnama
विशेष

Thane Lok Sabha News: आनंद दिघेंनी गाडीतच जाहीर करून टाकले अन् ठाणे मतदारसंघ हिसकावून घेतला!

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha Constituency2024) कोण लढणार यावरून भाजप-शिवसेनेतील तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाण्यात मुख्यमंत्र्यांचीच कोंडी झाली असल्याचे चित्र आहे.

ठाणे हा शिवसेनेचा (Shiv Sena) गड आहे. हा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे महायुतीकडे जोरदार प्रयत्न करीत आहेत. यानिमित्ताने हा मतदारसंघ भाजपच्या हातातून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांनी कसा हिसकावून घेतला, याची आठवण शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांना आजही होत आहे.

१९९२ मध्ये अयोध्येत बाबरी पडली. भाजपने जबाबदारी झटकली; पण बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समस्त देशाचे हिंदुहृदयसम्राट बनले होते. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकांचा काळ सुरू झाला. यांची आठवण सांगितली जाते. तेव्हा भाजपसोबत शिवसेनेची युती असली तरी आनंद दिघे यांनी मात्र आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले आपले मित्र वसंत डावखरे यांच्यासोबत भाजपचा ठाणे जिल्ह्यातला रथ कसा रोखला, हे जाणून घेऊयात.

आनंद दिघे यांना हे पटले नाही...

देशात हिंदुत्वाची लाट उसळली होती. त्यावेळी ठाणे जिल्ह्याचा मिळून एकच असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम कापसे खासदार होते. कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. आनंद दिघे यांना हे पटले नाही. युती धर्म म्हणून त्यांनी सभेत मोडता घातला नाही; पण संध्याकाळी सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून ते सभा ऐकायला गेले. त्यावेळी त्यांच्यासोबतच्या खास माणसांमध्ये वसंत डावखरे हेसुद्धा होते.

दिघे यांनी गाडीतच जाहीर करून टाकले ...

भाषणात कापसे यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख ‘देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट’ असा करताच दिघे अस्वस्थ झाले. हिंदुहृदयसम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे, असे म्हणत ते संतप्त झाले... इकडची दुनिया तिकडे होईल; पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल, असे त्या वेळी आनंद दिघे यांनी गाडीतच जाहीर करून टाकले आणि निवडणुकांची घोषणा होताच जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परांजपे यांना उमेदवारी..

शिवसेनाप्रमुखांसह अनेकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर दिघे यांना आनंद होईल, असा निर्णय झाला आणि ठाणे लोकसभा पहिल्यांदाच शिवसेनेच्या ताब्यात आली. त्यावेळी प्रकाश परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली. दुखावलेल्या संघाची मते मिळणार नाहीत, हे गृहीत धरून आनंद दिघे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला.

२०१९ मध्येही त्याची पुनरावृत्ती...

अर्थात पडद्याआडून राजकीय शत्रू; पण दिलदार मित्र असलेल्या वसंत डावखरे यांची साथ त्यांना मिळाली आणि परांजपे लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९६ पासून सलग चार वेळा प्रकाश परांजपे यांनी ठाणे लोकसभेचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतरही २००८ मध्ये त्यांचे पुत्र आनंद परांजपे पोटनिवडणुकीत जिंकून आले. मात्र, २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेला हा लोकसभा मतदारसंघ शिवसनेने २०१४ मध्ये पुन्हा ताब्यात घेतला. २०१९ मध्येही त्याची पुनरावृत्ती झाली. मोदी लाट असे म्हणत असले तरी खरा करिष्मा होता तो आनंद दिघे यांचा. आज आनंद दिघे आणि वसंत डावखरे दोघेही हयात नाहीत; पण त्यांच्या मैत्रीचे किस्से आणि दबदबा कायम आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT