Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
विशेष

बारामतीचा कार्यक्रम २०१९ मध्ये हुकलाय; तो २०२४ ला करायचाय : भाजप नेत्याचा इशारा

मंगेश कचरे

इंदापूर : ‘ए’ म्हटले की अमेठी. बी म्हटले की बारामती (baramati). ‘ए’चा कार्यक्रम २०१९ लाच केला आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत बारामतीचा कार्यक्रम हुकला आहे. तो २०२४ ला करायचा आहे, त्याच्यासाठीच १७ महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. हे नियोजन असे तसे नसून देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे (bjp) नेते आणि आमदार राम शिंदे (ram shinde) यांनी बारामती लोकसभा निवडणूक (Loksabha Election) जिंकण्याबाबत पक्षाच्या तयारीवर भाष्य केले. (Baramati Lok Sabha constituency to be won in 2024 : BJP leader Ram Shinde warns)

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या २२ सप्टेंबरपासून तीन दिवस मतदारसंघात असणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी इंदापूरमध्ये बैठक घेतली. त्यात त्यांनी राष्ट्र्रवादीवर निशाणा साधला.

आमदार शिंदे म्हणाले की, देशाच्या अर्थमंत्री तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यातील एक दिवस इंदापूरला मुक्कामी येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, हे लक्षात येते. बारामती लोकसभेची निवडणूक जिंकायचीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी माझ्यावर आहे. येत्या २२, २३ व २४ सप्टेंबर रोजी निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वी ६ सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दौरा आहे. यामध्येच सीतारमन यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

आम्ही २०१४ आणि २०१९ ची निवडणूक बारामतीत हरलो. पण, २०१४ ते २०२४ या काळात प्रचंड बदल झाला आहे. जर आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर बारामतीही आम्ही जिंकू, असा विश्वास व्यक्त करत ‘आम्हाला अमेठीला जावं वाटलं, आम्ही अमेठीत गेलो आणि जिंकलो. आम्ही बारामतीत २०१४ ला हरलो, २०१९ लाही हरलो. मात्र, २०२४ मध्ये आम्ही बारामती जिंकणारच, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना दुसरा वायनाड पहावा लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT