Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
विशेष

आमदारांना माहित नसलेला पंढरीचा विकास आराखडा कुणी तयार केला : भालकेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा (Pandharpur) विकास करावयास निघालेल्या प्रशासनाला, येथील रहिवाशांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडून जबाबदार लोकप्रतिनिधीला (आमदार समाधान आवताडेंना Samadhan Avtade) माहीत नसलेला विकास आराखडा तयार केला कुणी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी केला. भालके यांच्या प्रश्नाचा रोख मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या दिशेने होता. (Bhagirath Bhalke criticizes former MLA Prashant Paricharak without naming)

पंढरपूर विकास आराखड्याच्या अनुषंगाने शहरातील बाधित होणारे छोटे-मोठे व्यापारी, खोकेधारक, भाजी मंडईतील भाजी विक्रेते, मंदिर परिसरातील सर्व दुकानदार, व्यापारी या सर्वांशी चर्चा करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके, दिलीप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये हा सवाल उपस्थित करण्यात आला.

भालके म्हणाले की, विकासाच्या नावाखाली १९८१ पासून नागरिकांना बेघर करण्याची परंपरा सुरू झाली आहे. तब्बल ४० वर्षानंतर देखील त्या बेघर झालेल्या लोकांना न्याय मिळाला नाही. प्रशासनाने वाराणसीच्या धर्तीवर विकास आराखडा तयार केल्याचा दावा केला असला तरी तेथील आणि येथील भौगोलिक रचना वेगळी आहे. विकास आखाड्याच्या माध्यमातून कुटुंबावर नांगर फिरत असताना लोकप्रतिनिधींनी जागरूक असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांचे लक्ष नसल्यामुळे प्रशासन त्याच्या सोयीने आराखडा तयार करीत आहे.

वारी आल्यानंतर कुठलीही परिस्थिती न पाहता निधी उपलब्ध होतो. निधीतून होणारे रस्त्याची कामे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची केली जातात. याबाबत कधी पडताळणी केली जात नाही. गोरगरीब रहिवाशांना त्रास देत असताना पहिल्यांदा विनंती केल्यानंतर समजत नसेल तर वेगळ्या पद्धतीने सांगण्याची शिकवण देखील स्वर्गीय भारतनानांनी या भागातील कार्यकर्त्यांना दिली आहे. विकास आराखडा शहरवासीयांच्या विचाराने विश्वासात घेऊन झाला पाहिजे. शहर विकासाला सहकार्य राहील. विकासाच्या नावाखाली व्यवसाय व कुटुंबाची घरे पाडू देणार नाही. प्रसंगी व्यापारी आणि नागरिकांची एकही वीट पडू देणार नाही. आम्ही भारत नानांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत, वेळ पडल्यास आंदोलनातूनही आवाज उठविण्यात येईल, असा इशाराही भगिरथ भालके यांनी दिला.

यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कोळी, एकनाथ शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश साठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय घोडके, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भादुले, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे, मनसे उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, अभयसिंह इचगावकर, राष्ट्रवादीच्या साधना राऊत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT