Indian Politics : देशाच्या राजकीय वाटचालीत अनेक नेत्यांनी इतिहास घडवला आहे. पण अनेकांची नावे पुढे इतिहासजमा झाली. तर काही नेत्यांच्या लोकप्रियतेचे ठसे आजही त्यांच्या कामाची आठवण करून देतात. असेच एक नाव म्हणजे भगवंतराव मंडलोई. तुरुंगात असताना नगरपालिकेची निवडणूक लढणारे आणि जनतेच्या आग्रहाने नगराध्यक्ष बनलेले हे नेते पुढे काही वर्षांतच मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले होते. तुरुंगातून निवडणूक लढवत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेले ते पहिले नेते ठरले होते.
मध्य प्रदेशात जननायक म्हणून भगवंतराव मंडलोई यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एका जमीनदाराच्या कुटुंबात झाला होता. पुढे शिक्षणासोबत समाजसेवेतही त्यांचा रस वाढत गेला. खंडवामध्ये प्रसिध्द वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. प्रामुख्याने जनतेचे हक्क आणि अधिकारांसाठी ते लढत असत.
वकिली सुरू असतानाच मंडलोई हे महात्मा गांधी यांच्या आंदोलनांमध्येही सक्रीय होते. असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यादरम्यान ते अनेकदा तुरुंगात गेले. 1942 मध्ये तुरुंगात असतानाच त्यांनी खंडवा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. ते निवडणूनही आले. एवढेच नाही तर जनतेने त्यांना नगराध्यक्षही बनवले. या काळात त्यांची लोकप्रियता शिखरावर होती.
स्वातंत्र्यानंतर त्यांच्यावर संविधान निर्मिती समितीमध्ये महत्वाचे स्थान मिळाले. 1947 ते 1956 दरम्यान ते राजकारणा सक्रीय होते. 1956 नंतर मध्य प्रदेश अस्तित्वात आल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे 1962 मध्ये ते पूर्णवेळ मुख्यमंत्री बनले. मात्र, केवळ काही महिन्यांसाठी त्यांना संधी मिळाली होती. असे असले तरी त्यांचे नाव इतिहास कोरले गेले होते.
मंडलोई यांच्या कुटुंबातील सदस्य सध्या राजकारणापासून दूर आहे. मात्र, समाजकारणात कुटुंबाचा वाटा मोठा राहिला आहे. त्यांचे पुत्र रामकृष्ण राव मंडलोई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. दुसरे पुत्रे लक्ष्मण राव मंडलोई नगरसेवक होते. तिसरे पुत्र रघुनाथ राव मंडलोई यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या घरातील एक महिला सदस्य नंदा मंडलोई या 1985 ते 1990 दरम्यान खंडवाच्या आमदार होत्या.
एवढा मोठा राजकीय वारसा असूनही सध्या त्यांचे कुटुंब राजकारणात सक्रीय नाही. मात्र, भगवंतराव मंडलोई यांचे नाव आजही खंडवा आणि निमाडमध्ये समाजसेवा आणि प्रामाणिकपणाबद्दल घेतले जाते. जनसेवा आणि देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेला नेता म्हणून भगवंतराव मंडलोई आजही जनतेच्या मनात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.