BJP imported candidate controversy : अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भाजपचे बहुमत असतानाही उमेदवार आयात का? या आशयाची एक निनावी व्हॉट्सअॅप पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर कोणी अंगठा दाखवत आहे, कोणी हास्य इमोजी तर कोणी रडणारे इमोजी पोस्ट करत आहे. मात्र, या मजकुरावर उघडपणे भाष्य करण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
काही ग्रुपमध्ये ही पोस्ट ‘भाजप (BJP) निष्ठावंत ग्रुप’च्या नावाने फिरत असल्याचे सांगितले जात आहे. पोस्टवर लेखकाचे किंवा कोणत्याही जबाबदार व्यक्तीचे नाव नसले तरी तिच्या आशयामुळे भाजपच्या स्थानिक राजकारणात चर्चा रंगल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्ष सोडून पक्षात आलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच संबंधित पोस्ट व्हायरल झाल्याने तिचे राजकीय महत्त्व वाढले आहे.
पोस्टमध्ये भाजपच्या जनसंघ काळापासून पक्ष उभारणीत योगदान देणाऱ्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत सायकलवरून गावोगावी प्रचार, आणीबाणीच्या काळातील तुरुंगवास आणि वैयक्तिक आयुष्याची पर्वा न करता पक्ष वाढविण्यासाठी केलेला संघर्ष याची आठवण करून देण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे पक्ष जिल्ह्यात मजबूत झाला, मात्र आजही त्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढ्यांनाही संधी मिळत नसल्याची खंत पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
व्हायरल मजकुरात भाजपच्या ‘पार्टी विथ डिफरन्स’ या ओळखीचाही उल्लेख करण्यात आला आहे. जिल्ह्यात शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपलब्ध असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आणून उमेदवारी देण्याची वेळ येणे हे पक्षासाठी दुर्दैवी असल्याचे मत त्यात मांडण्यात आले आहे.
पक्षासाठी दशकानुदशके काम करणाऱ्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची नावे देत, त्यांना संघटनेत डावलले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जेव्हा फळे चाखायची वेळ आली, तेव्हा बाहेरून आलेल्यांनाच संधी दिली जात आहे, असा सूर या पोस्टमध्ये दिसून येतो. पोस्टमधील आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे, जिल्ह्यातील अनेक भाजप आमदारांच्या नावापुढे भाजपचे चिन्ह असले तरी त्यांची राजकीय मुळे इतर पक्षांत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी व्यक्त करताना पोस्टमध्ये पक्ष नेतृत्वाला इशाराही देण्यात आला आहे. सध्या सत्तेच्या जोरावर पक्षात आलेले अनेक नेते उद्या परिस्थिती बदलल्यास पक्ष सोडून जातील, असा दावा त्यात करण्यात आला आहे. आज निष्ठावंत कार्यकर्ते शांत आहेत. पण आगामी काळात पक्षाला याची किंमत मोजावी लागू शकते, असा इशाराही या निनावी मजकुरात देण्यात आला आहे.
दरम्यान, या पोस्टमध्ये रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला, असा उल्लेख करत ज्या कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत, त्यावरूनही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी या यादीतील काही नावांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.या नेत्यांनी नेमके कधी आणि कुठे रक्ताचे पाणी केले? असा सवाल विचारला जात आहे. तर काहींनी मिश्कील प्रतिक्रिया देत, रक्ताचे पाणी केले असेल तर त्याचे शिंतोडे आता सत्तेच्या रूपाने स्वतःवरच उडवून घेत आहेत, अशी टोलेबाजी केली आहे. याशिवाय काही ग्रुपमध्ये मूळ पोस्टमधील काही नावे वगळून नव्या नावांची भर घालण्यात आल्याचेही दिसून येत आहे.
या पोस्टला उत्तर म्हणून काही ग्रुपमध्ये ‘अरण्यरुदन’ हा एकच शब्द आणि त्याचा अर्थ व्हायरल केला जात आहे. त्यानुसार, अरण्यरुदन म्हणजे निष्फळ आक्रोश किंवा व्यर्थ तक्रार, अशी हाक ज्याला ऐकणारे कोणी नसते. या माध्यमातून पोस्ट करणाऱ्यांच्या नाराजीची खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच विधान परिषद निवडणूक लढविण्याची वास्तविक क्षमता, मतदारांशी संपर्क, संघटनात्मक ताकद आणि पक्षाकडे अधिकृत मागणी अशा मुद्द्यांवरही काही निनावी प्रतिक्रिया समोर येत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेली ही पोस्ट केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने भाजपमधील निष्ठावंत विरुद्ध आयात नेते हा जुना वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या निनावी पोस्टमागे नेमके कोण आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नसला तरी तिने भाजपच्या स्थानिक संघटनात्मक राजकारणातील अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांमधील भावना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणल्या आहेत. आगामी काळात या चर्चेचे राजकीय पडसाद उमटतात का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.