BJP-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

Shinde Group In Trouble: भाजपच्या नव्या भूमिकेमुळे शिंदे गटाला फुटला घाम; लोकसभा कमळ चिन्हावर लढविण्याचा आग्रह

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News: भारतीय जनता पक्षाच्या नव्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटाने कमळ चिन्हावर लढवावी, असा आग्रह भाजपने धरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता अधिवेशन काळात दिसून आली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (BJP insists Shinde group to contest Lok Sabha election on lotus symbol)

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग दिला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एनडीएमधील घटक पक्षाच्या खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात नुकतीच घेतली आहे. पक्षीय पातळीवरही निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात करण्यात आलेली आहे. आता मात्र भाजपची मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाबाबतची नवी भूमिका चर्चेला येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाने लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी, अशी भूमिका भाजपने घेतल्याची चर्चा संसदेच्या अधिवेशन काळात दिल्लीत जोरात रंगली होती. भाजपच्या नव्या पवित्र्यामुळे शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना धडकी भरल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या या भूमिकेला शिंदे गटाला विरोध करत येत नाही आणि होकार द्यावा, तर स्वतंत्र अस्तित्व संपण्याची चिन्हे असल्याचे त्यांची अवस्था ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

त्या पाच खासदारांवर कारवाई होणार : शेवाळे

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांवरील कारवाईबाबतही खासदार राहुल शेवाळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अविश्वास ठरावावेळी खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावला होता. त्याचवेळी मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी पुन्हा रिमायंडर व्हीपही दिला होता. मात्र, ठाकरे गटाचे पाच खासदार मतदानावेळी वॉकआउट करून सभागृहाच्या बाहेर गेले, त्यामुळे गैरहजर राहिलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांवरील चर्चेसंदर्भात सोमवारी वकिलांशी चर्चा करून त्यांना नोटीस देण्यात येईल. त्यामुळे त्या पाच खासदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT