BJP News Sarkarnama
विशेष

BJP News: विधान परिषद, कसब्यातील पराभवानंतर भाजप खडबडून जागा; लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक घेण्याची केली मागणी

नऊ महिन्यांनंतरही राज्यात म्हणावा तसा जम बसवता न आल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर घ्यावी, अशी शिफारस राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: कसबा पोटनिवडणुकीत बसलेला धक्का आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभव यामुळे भारतीय जनता पक्ष (BJP) खडबडून जागा झाला आहे. महाविकास आघाडीचे कडवे आव्हान आणि नऊ महिन्यांनंतरही राज्यात म्हणावा तसा जम बसवता न आल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर घ्यावी, अशी शिफारस राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यांचे नेत्यांचे लक्ष असणार आहे. (BJP leader's recommendation to Center to hold Maharashtra Legislative Assembly elections with Lok Sabha)

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी आहे. मात्र, पुढील वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेची निवडणूक घेण्याची मागणी राज्यातील भाजप नेत्यांची आहे. त्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्वाकडून विचारविनिमय सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्तांतर घडविले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारचा जम अजूनही बसलेला नाही. राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे सरकारला अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करता आलेला नाही. त्यातच सरकारसमोर रोजच अडचणी वाढत आहेत. शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले असले तरी ती युती जनतेत रूजायला वेळ लागू शकतो, हे ओळखून भाजपने हे पाऊल उचलले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अमरावती, नागपूर यासारख्या बालेकिल्ल्यात पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर झालेल्या दोन पोटनिवडणुकीतही २८ वर्षांचा कसब्याचा गड कोसळला. चिंचवडची जागा जिंकली असली तरी त्यात महाविकास आघाडीच्या बंडखोराचे मोठे योगदान असल्याचे निकालातून पुढे आले आहे. त्यामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत, त्यामुळेच भाजप लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक लढवू इच्छित आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना कमकुवत झाली असली तरी महाविकास आघाडी अजूनही मजबूत असल्याचे निवडणुकीत दिसून आलेले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये लोकसभेच्या जागेचे वाटप झाल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यातच शिंदे आणि सहकाऱ्यांच्या बंडखोरीबाबत जनमताचा अंदाज लागू शकत नाही. लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेतल्यास ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आणि लोकप्रियतेवर जिंकता येईल. त्यात स्थानिक मुद्दे बाजूला राहतील, असा होरा भाजपचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाकडे ही मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT