विशेष

Nagpur Politics : फडणवीसांनी डावललेल्या नेत्यासाठी रविंद्र चव्हाणांची फिल्डिंग; पुन्हा आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिलं टार्गेट

Nagpur Politics : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासाठी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची तयारी तातडीने सुरु करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur Politics : "हजार पदवीधरांची नोंदणी करा आणि महापालिकेचे तिकीट मिळवा" अशी ऑफर देत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी चव्हाण नागपूरला आले होते, यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

रवींद्र चव्हाण म्हणाले, शहरातील प्रत्येक बूथवरून किमान 100 पदवीधरांशी संपर्क केला पाहिजे, त्यांची नोंदणी केली पाहिजे. जो सक्रिय कार्यकर्ता, पदाधिकारी आहे त्याने किमान 1 हजार घरांशी संपर्क केला पाहिजे. हजार घरांपर्यंत संपर्क साधून नोंदणी करणारी व्यक्ती महापालिका उमेदवारी निवडणुकीसाठी मागण्यास पात्र समजली जाईल, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

भाजपने या निवडणुकीसाठी नोंदणीप्रमुख म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांची नियुक्ती केली आहे. भाजपचा नोंदणीप्रमुख हाच पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार असतो. त्यामुळे कोहळे यांचे तिकीट पक्के मानले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण नागपूरचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष असलेल्या कोहळे यांचे तिकीट कापले होते.

कोहळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जातात. त्यानंतरही कोहळेंचे तिकीट कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र मोहन मते यांच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. पण आता रविंद्र चव्हाण यांनी आतापासूनच कार्यकर्त्यांना कामाला लावल्याने सुधाकर कोहळे यांचे पुनर्वसन होणार हे निश्चित मानले जाते.

भाजपचे कार्यकर्ते वैतागले :

विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभर राबवून घेण्यात येत असल्याने भाजपचे कार्यकर्ते आधीच वैतागले आहेत. यात आता रवींद्र चव्हाण यांनी नवे टार्गेट दिले आहे. त्यापूर्वी येत्या 4 महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. असे असताना आधी लगीन कोंढाण्याचे लावायचे सोडून वर्षभर लांब असलेल्या पदवीधर निवडणुकीच्या कामाला जुंपलं जात असल्याने कार्यकर्ते अस्वस्थता झाले आहेत.

यापूर्वी भाजपने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे टार्गेट दिले होते. या निवडणुकीचा लेखाजोखा महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट देताना तपासला जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर भाजपने भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली.

यातही कार्यकर्त्यांना कामाला लावले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी लहान मोठ्या सभा घेण्यास लावल्या. या सभेला कोण किती गर्दी जमवतो हे बघून महापालिकेची तिकीट दिले जाईल असे सांगण्यात आले होते. लगेच निवडणूक जाहीर होईल या आशेने कार्यकर्ते कामाला लागले होते. आता हा कार्यक्रम संपताच पदवीधरचे नवे टार्गेट देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT