Ajit Pawar- Harshvardhan patil
Ajit Pawar- Harshvardhan patil Sarkarnama
विशेष

अजितदादांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याची जबाबदारी भाजप देणार हर्षवर्धन पाटलांच्या खांद्यावर?

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (जि. पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता असणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे या बँकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पवार यांच्या वर्चस्वाला भाजप आव्हान देण्याच्या तयारीत असून त्याबाबतची जबाबदारी सहकार खाते सांभाळलेले, अजितदादांचे कट्टर विरोधक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष असणार आहे. (BJP will Gives responsibility of Ajit Pawar-ruled Pune District Bank elections to Harshvardhan Patil)

राज्यातील प्रमुख अग्रणी असणाऱ्या बँकांमध्ये पुणे जिल्हा बँकेचा समावेश होतो. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी जिल्हा बँक ताब्यात ठेवण्याकडे सर्व पक्षाचा कल असतो. पण, पुणे जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून पवार यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. याच बहुमताच्या आधारे बँकेने पूर्वी तीन लाखापर्यंत व नव्याने पाच लाखापर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशभरात कौतुक झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत पूर्ण होऊनही जवळपास सव्वा वर्ष झाले आहे. सर्वच सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त करणे शक्य नसल्याने कायद्यातील तरतुदीचा आधार घेत सरकारने बँकेच्या विद्यमान संचालक मंडळालाच मुदत संपल्यानंतरही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. अशातच २८ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी बॅंकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, व काँग्रेस बँकेच्या निवडणुकीसाठी जवळपास एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त भाजपच्या जिल्हा बँकेबाबतच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अर्थात या निवडणुकी संदर्भात पाटील यांच्याबरोबर आमदार राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, तसेच भाजपचे इतर नेते एकत्रितपणे काय भूमिका घेतात, याची उत्सुकता असणार आहे. ज्याप्रमाणे भाजपने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविली, त्याच पद्धतीने पक्ष जिल्हा बँकेचीही निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विचार मंथन सुरू आहे. त्यासाठी सहकार खाते सांभाळलेले भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या पुढे विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रणनीती पुढे भाजप चा कितपत टिकाव लागेल. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT