Girish Bapat
Girish Bapat sarkarnama
विशेष

पुण्यात भाजपच्या जागा वाढविण्यासाठी बापटांनी सांगितला फॉर्म्यूला : दिग्गजांचे धाबे दणाणणार!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : चंद्रकांतदादा (Chandrakant Patil), आपल्याला पुणे (Pune) महानगरपालिकेत २० ते २५ जागा वाढवायच्या असतील तर पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढवेन, अशी भूमिका भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना ठेवावी लागेल. माझ्या घराजवळील वॉर्डातूनच मी निवडणूक लढवेन आणि दुसऱ्या वॉर्डातून मी लढणार नाही, असे चालणार नसल्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना स्पष्टपणे बजावले. (BJP workers should contest from where party says : Girish Bapat)

अमित शहा आणि भाजपची वाटचाल या मराठीतील अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी खासदार बापट यांनी वॉर्ड रचना, ठराविक वॉर्डासाठी अडून बसणाऱ्या इच्छुकांना भरसभेत स्पष्टपणे इशारा दिला. दरम्यान, हा फॉर्म्यूला खरेच अमलात आला तर अनेक दिग्गजांना त्याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.

ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पक्ष सांगेल त्याप्रमाणे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात आणि जिंकतात. उद्या मला वॉर्ड बदलायला लावला तर स्मृती इराणी आणि चंद्रकांत पाटील काय बोलले, हे आपण काही ऐकलं नाही, असे सांगत आपण आणि आपलं साम्राज्य, असा करू नका. एक इंचसुद्धा इकडे तिकडे सरकायला काही जण तयार नाहीत. माणसं कुठच्या कुठं जातात आणि निवडून येतात. आपल्याला असा काय कमीपणा वाटतो. चंद्रकांतदादा पुणे शहरात आपल्याला वीस ते पंचवीस जागा वाढवायच्या असतील, तर आज येथे अनेक दिग्गज आहेत. पक्षाच्या विजयासाठी पक्ष सांगेल तिथे जाऊन निवडणूक लढवेन, अशी भूमिका कार्यकर्त्यांना ठेवावी लागेल.

या वेळी भाषणात गिरीश बापट यांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला. मी राहायला एकीकडे आणि निवडून यायचो दुसरीकडून. मला भारतीय जनता पक्षाने सांगितले की तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून लढा आणि मी लढलो. त्या ठिकाणी मी महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष यांना पराभूत केले. पुणे शहरात भाजपची सत्ता आणायची असेल तर भविष्यात आपल्यला जोरदारपणे लढाई करावी लागेल. माझ्या घराजवळील वॉर्डातूनच मी निवडणूक लढवेन. बाहेरच्या वॉर्डातून लढणार नाही, अशी भूमिका चालायची नाही. तशी लढाई नसते, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना जरा स्पष्टपणेच सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT