Sharad Pawar-Sanjay Raut Sarkarnama
विशेष

महाआघाडीत खडाखडी : राऊतांच्या आरोपाने राष्ट्रवादीचे नेते नाराज; पवारांकडे तक्रार!

सिल्व्हर ओकवरील बैठकीत संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवारांकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः राज्यसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत खडाखडीस सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी (NCP) समर्थक अपक्षांवर आरोप करणाऱ्या खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) तक्रार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार (sharad Pawar) यांच्याकडे केली आहे. राऊतांनी नावे घेऊन जो अविश्वास दाखवला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजीची भावना आहे. आता पवार यावर कसा तोडगा काढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Complaint of Sanjay Raut from NCP leaders to Sharad Pawar)

राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक ‘सिल्व्हर ओक’वर बोलावली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्याबाबत नाराजी भावना बोलून दाखवली. संजय राऊत यांच्या अशा वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होत असल्याची भावनाही या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांवर आरोप केला हेाता. त्यात देवेंद्र भुयार, संजय शिंदे, श्यामसुंदर शिंदे यांच्यावर आरोप करताना क्रॉस व्होटिंगचा आरोप केला होता. त्यानंतर या तीनही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती.या तिघांनी आपापली भूमिका स्पष्ट करताना वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मतदान केल्याचे सांगितले होते.

आमदार देवेंद्र भुयार यांनी तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारानांही आज सकाळी भेटले. विधान परिषदेची निवडणूक समोर असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्याचा आमदारांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राऊत यांच्या वक्तव्यामुळे आमदारांवर काय परिणाम होऊ शकतो, याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते या अपक्ष आमदारांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यसभेतील पराभावानंतर शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत तुमचे तुम्ही आमचे आम्ही अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत २७ मतांचा कोटा ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता या दोघांचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात. मात्र काँग्रेसकडे तेवढंसं संख्याबळ नसल्यामुळे त्यांची अडचण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT